उस्मानाबाद/प्रतिनिधी -
वनक्षेत्रात जाऊन चारा खाणारी जनावरे सोडण्यासाठी 2100 रुपयांची लाच घेताना बार्शीच्या वनरक्षक व वनमजुराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई कडकनाथवाडी (ता. वाशी) येथे 26 डिसेंबरला करण्यात आली. याची शहानिशा करून शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
एक शेतकरी जनावरे चारण्यासाठी घेऊन जात होता. त्याची 21 जनावरे चुकून वनक्षेत्रात घुसली. तेव्हा बार्शी परिक्षेत्रातील वनरक्षक राजाभाऊ विठ्ठल जाधवर, रोजंदारी वनमजूर भरत दामू जाधवर यांनी जनावरे पकडली. शेतकऱ्याने जनावरे पकडल्यामुळे दंड घेऊन जनावरे सोडण्याची विनंती केली. मात्र, त्यांनी कोणताही दंड न आकारता 4000 रुपये लाचेची मागणी केली. तेव्हा तडजोडी अंती 2100 रुपये लाच ठरवण्यात आली. त्यानंतर लाचलुचपत विभागाकडे शेतकऱ्याने तक्रार केली. यामुळे उस्मानाबादच्या पथकाने तेथे सापळा लावला असताना 26 डिसेंबरला दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, वनरक्षकांना दंड घेण्याचा अधिकार आहे का, याची शहानिशा करण्यासाठी एसीबीने वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार केला. तेव्हा वनविभागाच्या वरिष्ठांनी वनरक्षकांना दंड सांगणे, ठरवणे, स्वीकारणे यासंदर्भात कोणताही अधिकार नसल्याचे पत्र दिले, असे एसीबीचे पोलिस उपाधीक्षक रवींद्र थोरात यांनी सांगितले. पत्र आल्यानंतर शुक्रवारी येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 
 
Top