उमरगा/प्रतिनिधी-
शहरातील बिरुदेव मंदिराजवळील शेतात बुधवारी (दि.15) दुपारी भुसणी वाडीतील एकाचा खून करून मृतदेह टाकल्याचे समोर आले होते. याप्रकरणी उमरगा पोलिसांनी संशयावरून पाच जणांना अटक करून सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत (दि. 23) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बिरूदेव मंदिर परिसरात असलेल्या एका शेतात गांधी अर्जुन मंडले (रा. भुसणीवाडी) या व्यक्तीचा गळा चिरून, पोटावर व हातावर वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. तपासादरम्यान गांधीचा मोबाइल क्रक्रमांक बुधवारी पहाटेपर्यंत चालू होता. यावरून तपासाची चक्रे हलवत पोलिसांनी भाऊ मांतेश अर्जून मंडले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संतोष बाबुराव ईश्वरे (35 वर्ष रा. कासारशिर्सीवाडी ता.निलंगा), धरणाम्मा सुंदरप्पा नगरेड (40 वर्ष रा. खंडाळा ता. बस्वकल्याण), संजय रंगराव भोसले (38 वर्ष रा. मुगळेवाडी ता.बसवकल्याण), भास्कर पांडुरंग भोसले (31 वर्ष रा. घोटाळ ता. बसवकल्याण), लक्ष्मण रंगाण्णा मंडले (20 वर्ष रा. खंडाळा ता. आळंद ) यांच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. सोमवारी संशयित आरोपींना प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि. 23 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे करत असून हा खून नेमका कोणत्या कारणावरून झाला याचा उलगडा पोलिस यंत्रणा करत आहे. 
 
Top