लोहारा/प्रतिनिधी-
सध्याच्या सुशिक्षीतांना सुसंस्कारीत बनविण्याची गरज असुन युवकांनी सोशल मिडीयाचा गैरवापर थांबवावा. भौतीक सुखाच्या मागे न लागता संस्कृतीचा आदर करावा, असे मत जेष्ठ साहीत्यिक तथा वक्ते डॉ. संजय कळमकर ( अहमदनगर) यांनी व्यक्त केले.
उमरगा शहरातील रोटरी क्लब व व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजीत तीन दिवसीय व्याख्यानमालेप्रसंगी  आनंदाच्या वाटा  या विषयावर डॉ. कळमकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्रांतपाल डॉ.दिपक पोफळे होते. तर प्रमुख म्हणुन साहित्यीक मोहीब कादरी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सिद्रामप्पा चिंचोळे, कार्याध्यक्ष नितीन होळे, रोटरीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विनोद देवरकर, सचिव प्रा. युसुफ मुल्ला उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. कळमकर म्हणाले की, दु:ख मिळत असतं पण आनंद शोधावा लागतो, आपण नेहमी सकारात्मक दृष्टी ठेवली पाहीजे. दुस-याच्या दु:खात सुख शोधु नये असेही ते म्हणाले. कृषी बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, किल्लारी सहकारी कारखान्याचे चेअरमन संताजी चालुक्य, डॉ.उदय मोरे हरीप्रसाद चंडक, प्रशांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती. प्रा. डॉ. संजय अस्वले पी.एस. पाटील, अनिल मदनसुरे, अमर परळकर आदींनी यासाठी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण स्वामी यांनी  केले. तर संजय ढोणे यांनी आभार मानले. यावेळी नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top