उस्मानाबाद/प्रतिनिधी-
‘जतन करा पाणी, असे सांगते संतवाणी’, ‘पाणी हेच जीवन, हेच आपले स्ंपदन‘, नको बंदी, नको कायदा, परिवर्तन करू हृदयाचे, पाश तोडूनी हव्यासाचे करू श्वास मोकळे भविष्याचे यासह अनेक उद्बोधक वाक्यरचना आणि त्याला पूरक अशा चित्रांनी शहरातील प्रमुख मार्गावरील भिंती बोलक्या झाल्या आहेत. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद शहरात सकाळपासून हा उपक्रम राबविण्यात आला. उस्मानाबादसह सोलापूर, लातूर तसेच राज्यभरातील शाळा, महाविद्यालयांमधील चित्रकलेची आवड असणारे विद्यार्थी, चित्रप्रेमी रसिक अशा शंभराहून अधिक स्पर्धकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
उस्मानाबाद येथे 10, 11 व 12 जानेवारी 2020 रोजी होत असलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून बोलक्या भिंतींचा उपक्रम शहरात राबविण्यात आला. साहित्य संमेलन स्थळाचा परिसर, श्री तुळजाभवानी जिल्हा क्रक्रीडा संकुल यासह प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी भिंती रंगविण्यात आल्या आहेत. शहराच्या  सौंदर्यात भर पडण्यासह सामाजिक संदेश देण्याचे कामही या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. पाणी वाचवा, पर्यावरण संवर्धन, स्त्रीभ्रूण हत्या, तंबाखू व्यसनमुक्ती यांसारख्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांसह संत गोरोबा काकांचे जीवनचरित्र, यासह संत साहित्याची गोडी वाढविणारे संतांचे संदेशही भिंतींवर रेखाटण्यात आले आहेत.
या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे, प्रमुख कार्यवाह रवींद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे, कार्यकारिणी सदस्य युवराज नळे, अ?ॅड. नीतीन भोसले, स्पर्धेचे संयोजक शेषनाथ वाघ, परीक्षक विजय यादव, अंबाजोगाई येथील विशेष परीक्षक शिल्पकार नेताजी यादव आदी उपस्थित होते.
स्पर्धकांना संयोजन समितीतर्फे अल्पोपहार, रंगसाहित्य, पेन्सिल, ब्रश, मध्यान्ह भोजन व्यवस्था संयोजन समितीतर्फे करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र बक्षीस पात्र विद्याथ्र्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र, रोख बक्षीस संमेलन मंचावर प्रदान करण्यात येणार आहे.  स्पर्धेसाठी विजयकुमार कुंभार, सहशिक्षक पांचाळ, राजेंद्र कुंभार, नामदेव राठोड आदींनी परिश्रम घेतले.

 
Top