उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात भूम, परंड्याचे आमदार तानाजी सावंत यांना घ्यावे, यासाठी जिल्हयातील शिवसैनिकांची बैठक राजे कॉम्प्लेक्स येथे होऊन मागासलेल्या  व दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्हयाला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी व न्याय देण्यासाठी प्रा.तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळात घ्यावे, असे प्रकारची विनंती करणारा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाची प्रत तुळजाभवानी दर्शन घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देणार असल्याची माहिती, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गेल्या फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात प्रा.तानाजी सावंत यांना अवघा दीड महिना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या दीड महिन्याच्या कार्यकाळात जनता दरबार, भूम, परंडा तालुक्यातील सिंचन प्रकल्प, विद्युत कामे आदी मार्गी लावली. मंत्री होण्यापुर्वी प्रा.तानाजी सावंत यांनी सामुहिक विवाह, बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांती आदी माध्यमातून समाज कार्य केले. निती आयोगाच्या अहवालानुसार उस्मानाबाद जिल्हा मागासलेल्या मध्ये तीस-या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे जिल्हयात वारंवार दुष्काळ पडत असतो, जिल्हयाला कृष्णाखो-यातील वाया जाणारे पाणी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रा.तानाजी सावंत अथक परिश्रम घेत होते. डिसेंबर २०२० पर्यंत जिल्हयात सर्वत्र पाणी करीन, असा त्यांनी शब्द दिला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्हयाला न्याय देण्यासाठी प्रा.तानाजी सावंत यांना मंत्री मंडळात घ्यावे, असे बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. यावेळी दत्ता साळुखे, जिला प्रमुख गौतम लटके, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, कांचनमाला संगवे, मोहन पणुरे, दत्तात्रय मोहिते, विजय सस्ते, गणेश शेडगे, शिवाजी कापसे, जगन्नाथ गवळी, सतिष सोमानी आदी तालुका प्रमुखासह मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top