उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मुंबई येथे सुरू असणा-या महालक्ष्मी सरस प्रदर्शनामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील सातही सहभागी गटांच्या उत्पादनांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. पहिल्या तीन दिवसांमध्ये दोन लाखापेक्षा अधिक ची विक्री झाल्याचे सांगण्यात आले.
 महालक्ष्मी सरस  प्रदर्शनासाठी देशभरातील 511 वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन असणा-या गटांची निवड करण्यात आली आहे.  यात उस्मानाबाद जिल्ह्यातील सात गटांची निवड झाली आहे. यामध्ये श्रीराम महिला स्वयंसहाय्यता समुह कसबे तडवळे ता.उस्मानाबाद, धनश्री महिला गट जहागिरदारवाडी ता.जि. उस्मानाबाद,जिजाऊ महिला गट चिंचपूर खुर्द ता.परंडा,आम्रपाली महिला गट तावशीगड ता.लोहारा, महालक्ष्मी गट वाकडी के ता.कळंब, संत रोहिदास स्वयंसहायता गट शिराळा ता.परंडा, प्रगती महिला स्वयंसहायता गट घाटनंदुर ता.भुम यांची विविध उत्पादने सरस मध्ये ठेवण्यात आली आहेत. यामध्ये आजीबाई ची गोधडी, कंदी पेढे,मसाले, सोयाबीनचे वेगळे प्रोडक्ट, विविध प्रकारच्या चटण्या,बंजारा हस्तकलेचे पोशाख,आभूषणं आदी वस्तूंचा समावेश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेल्या या स्टॉल्सना केंद्रीय सचिव बघेल मॅडम,उमेद मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला , मुख्य परीचालन अधिकारी रविंद्र शिंदे आणि विविध प्रशासकीय अधिकारी, सिनेअभिनेते तसेच सामाजिक न्याय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी भेट देऊन गटांच्या उत्पादनांचे विशेष कौतुक केले आहे .मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ.संजय कोलते,प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार  यांच्या मार्गदर्शनाखाली या गटांची उत्पादने गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी विविध प्रशिक्षण दिल्याची माहिती जिल्हा अभियान व्यवस्थापक अल्ताफ जिकरे यांनी यांनी दिली.

 
Top