तुळजापुर/प्रतिनिधी-
तुळजापूर नगर पालिकेच्या स्वीकृत सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी गटाने योग्य वेळी प्रस्तावच सादर न केल्याने सत्ताधारी गटाच्या दोन्ही सदस्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी सत्ताधारी गटाचे नानासाहेब लोंढे व अभिजित कदम यांची स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागली. दरम्यान, शेवटची सभा असल्याचे सांगून नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांनी सदस्यांचे बैठकीत आभार मानले व सोमवारी (दि.27) राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.
तुळजापूर पालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि.24) पालिकेची विशेष सभा बोलाविण्यात आली होती. यावेळी सत्ताधारी गटातर्फे गटनेते संतोष परमेश्वर यांनी लोंढे व कदम यांची नावे सुचवली तर विरोधी गटाच्या वतीने शिफारसच नसल्याने नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी चंद्रकांत कणे यांनी सदरील सत्ताधारी दोघांची निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी मुख्याधिकारी आशिष लोकरे, सभाधीक्षक वैभव अंधारे, सहाय्यक लिपिक महादेव सोनार आदींची उपस्थिती होती. निवडीनंतर नव निर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवक नेते विनोद गंगणे यांच्यासह सचिन रोचकरी, पंडित जगदाळे, विजय कंदले, किशोर साठे, मंजूषा देशमाने, अपर्णा नाईक, अश्विनी रोचकरी, हेमा कदम, शारदा भोसले, राहुल खपले, वैशाली कदम आदी नगरसेवकांची उपस्थिती होती. निवडीनंतर पालिकेच्या आवारात जल्लोष करण्यात आला.
 
Top