उस्मानाबाद/प्रतिनिधी -
समूहाचे प्रतिबिंब आजच्या साहित्यात उमटले पाहिजे. यामुळे साहित्याला समाजाच्या आरशाचा दर्जा मिळेल. यातून समाजातील उणिवा दूर करण्यासाठी समाजाकडूनच पुढाकार घेतला जाईल, असे कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केले.
उस्मानाबाद जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एम. डी. देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हयातील माध्यमिक मुख्याध्यापकांसाठी शिक्षण परिषद व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भालेराव बोलत होते. त्यांच्या व्याख्यानाचा 'शिक्षण शेती व साहित्य' हा विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील होते. यावेळी व्यासपीठावर एम. डी. देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे, मराठवाडा साहित्य परिषद शाखाध्यक्ष नीतीन तावडे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे, दिलीप पाटील, गोकुळदास नेरे आदी होते.
प्रा. भालेराव पुढे म्हणाले की, पूर्वी लोक जनावरांवर माया करीत होते. आज जनावरे केवळ दुधासाठी पाळत आहेत. पुर्वी महिला शेती कसत होत्या म्हणूनच शेतीच्या साधनांचा उत्सव साजरा केला जाता होता. शेती करणे ही कला असल्यामुळे शेतकन्याचे शेतीवर प्रेम असते. यावेळी प्रा. भालेराव यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शेतीवर भाष्य केले.
प्रारंभी मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश टेकाळे यांनी तर सुत्रसंचलन दौलत निपाणीकर यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक, नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपस्थिताचे आभार अनंत सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमात कवी इंद्रजित भालेराव यांनी मार्गदर्शन केले.

 
Top