
स्वराज्यासाठी बलिदान करणाऱ्या तानाजी मालुसरे यांचे शौर्य नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडणारा आणि जुन्या पिढीला प्रेरणादायी आठवण करून देणारा तान्हाजी हा चित्रपट राज्यात करमुक्त करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोमवारी पत्राद्वारे केली.
सुजितसिंह ठाकूर यांनी पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासातील कोंढाणा किल्ला सर करण्याचा तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक प्रसंग विलक्षण आहे. त्यांनी जिवाची बाजी लाऊन महत्त्वाचा गड सर केला आणि स्वराज्यासाठी बलिदान केले. तानाजी मालुसरे यांचे शौर्य नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडणारा आणि जुन्या पिढीला या ऐतिहासिक प्रसंगाची आठवण करून देणारा "तान्हाजी" हा हिंदी चित्रपट सध्या लोकप्रिय ठरला आहे. तान्हाजी हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अधिकाधिक मराठीजनांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याचे योग्य स्मरण होण्यासाठी "तान्हाजी" हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा. उत्तर प्रदेश राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने हा चित्रपट करमुक्त केल्याबद्दल मा. सुजितसिंह ठाकूर यांनी त्यांचे आभार मानले.