तेर/प्रतिनिधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ग्रामस्थांच्या  वतीने दिनांक 15 ते 22 जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह श्री गाथा पारायण व भक्तियज्ञ सोहळयाची बुधवार दि.22 रोजी टाळ मृदंगाच्या तालावर हरी नामाचा जयघोष करीत काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडी कलशाच्या मीरवणुकीसह आळंदी येथील हभप उमेश महाराज दशरथे यांच्या काल्याच्या कीर्तन सेवेनंतर महाप्रसादाच्या वाटपाने मोठ्या भक्तीमय वातावरणात हरीनाम सप्ताहाची उत्साहात सांगता झाली.
यावेळी तेरसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी काल्याच्या कीर्तनास हजेरी लावल्याने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी सप्ताह कालावधीत दररोज काकडा भजन , विष्णू सहस्त्रनाम , गाथा पारायण , श्रीमद्भागवत कथा , हरिपाठ , हरिकीर्तन , हरिजागर आदि धार्मिक कार्यक्रमासह राज्यभरातील नामवंत भजन सम्राट हभप दत्ता महाराज आंबीकर , शिवचरित्रकार हभप ज्ञानेश्वर महाराज कोठुळे , भागवताचार्य हभप आदिनाथ महाराज दानवे , वाणीभूषण हभप ज्ञानेश्वर महाराज तांबे , महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे सचिव हभप रामेश्वर महाराज शास्त्री , कूट अभंग प्रवक्ते हभप महादेव महाराज राऊत , भगवानबाबा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हभप आचार्य अर्जुन महाराज लाड अशा एकापेक्षा एक सरस कीर्तनकाराच्या कीर्तन सेवा संपन्न झाल्या. यावेळी संयोजक समिती सदस्यांसह ग्रामस्थांनी सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .

 
Top