उस्मानाबाद /प्रतिनिधी-
जिल्हा परिषदेतील पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांच्या विरोधात जिल्ह्यातील 22 विस्तार अधिका-यांनी शुक्रवारी दिवसभर धरणे आंदोलन केले. कर्मचाऱ्यांच्या अडचणी तत्काळ न सोडणे तसेच कर्मचाऱ्यांना उद्धटपणाची वागणूक देण्याचा आरोप या विस्ताराधिकारी यांनी केला आहे. दरम्यान पवार यांनी आरोप फेटाळले आहेत.
महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व्ही. जे. वाघमारे, उपाध्यक्ष संजय ढाकणे, सचिव डी. टी. साळुंके यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी विस्तार अधिकारी यांच्या बैठकीच्या इतिवृत्त यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. यामुळे त्यांच्यावर कर्तव्य कस्तुरी प्रकरणी कारवाई करणे तसेच त्यांच्याकडील पंचायत विभागाचा पदभार तात्काळ काढून टाकणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान अजिंक्य पवार हे कर्मचा-यांशी उध्द्टपणाने वागतात, अरेरावी करत असल्याचाही आरोप विस्तार अधिका-यांनी केला आहे. या आंदोलनामध्ये पंचायतसह समाजकल्याण विभागातील विस्तार अधिकारी सहभागी झाले होते. या सर्वांनी दिवसभर जिल्हा परिषदेच्या समोर ठिय्या मांडला. 15 दिवसात पवार यांच्यावर कारवाई न केल्यास त्यानंतर जिल्ह्यातील सर्व विस्तार अधिकारी सामूहिक रजेवर जातील. तसेच त्यांनी बोलवलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकतील. त्यांच्या कोणत्याही सूचनांचे पालन केले जाणार नाही. विशेष म्हणजे विभाग व सर्व राज्यभर लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा निवेदनाद्वारे विस्तार अधिका-यांकडून देण्यात आला आहे.

 
Top