उस्मानाबाद/प्रतिनिधी -
उच्च न्यायालयातील वकिलाकडून टिप्पणीवर ओळखीचा उपयोग करून सकरात्मक अभिप्राय घेण्यासाठी 14 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागातील जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. 7) करण्यात आली
महाराष्ट्र राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष तसेच जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयातील तीन कर्मचारी सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मागील वेतनाचा फरक न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने चार महिन्यात वेतनाच्या संदर्भात निर्णय घेण्याबाबत आदेश दिले होते. जिल्हा जलसंधारण लघुपाटबंधारे कार्यालयातील वरिष्ठ सहायक दत्तात्रय साहेबराव बुकन कार्यालयीन टिप्पणी तयार करून त्यावर उच्च न्यायालयात जिल्हा परिषदेच्या वकिलाकडून होकारार्थी अभिप्राय आपल्या ओळखीच्या बळावर घेण्यासाठी व त्याचे टिपण तयार करून कक्ष अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाचेची मागणी करत होते. यामुळे पाच दिवसापूर्वी यांना 11 हजार रुपये लाच देण्यात आली. मात्र, उर्वरित 14 हजार रुपये दिल्याशिवाय काम करणार नाही, असे सांगितल्यामुळे केंद्रीय उपाध्यक्षांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. यानुषंगाने बुकन यांची शहानिशा केली असता त्यांनी लाचेची मागणी करून 14 हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केल्याचे समोर आले. त्यानुसार दुपारी समतानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पानटपरी जवळ पैसे घेऊन येण्यास बुकन यांनी सांगितले होते. परिसरात सापळा लावण्यात आला. बुकन लाच घेताना जाळयात सापडले.

 
Top