तुळजापूर /प्रतिनिधी-
तिर्थक्षेत्र तुळजापूरात लाखो सुवासिनींनी पापनाश तीर्थ येथील इंद्रायणी कुंडातील पवित्र जलधारांनी प्रथम तुळजाभवानीच्या चरणी अर्पण केल्या तर दुपारी तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार पूजा मांडण्यात आली. सकाळी 7 वाजता पापनाश तीर्थ येथे इंद्रायणी देवीच्या महाआरतीने जलयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी शहरासह पंचक्रोशीतील हजारो सुवासिनींनी इंद्रायणीच्या पवित्र जलाने भरलेले जलकुंभ डोक्यावरून वाजतगाजत मंदिरात आणले. जलयात्रेने आणलेल्या इंद्रायणीच्या पाण्याने तुळजाभवानी मातेचा गाभारा, सिंह गाभारा व सभामंडप धुवून काढण्यात आला. तर मंदिर संस्थानच्या वतीने सुवासिनींची खणा-नारळाने ओटी भरण्यात येऊन दुपारी 1 च्या सुमारास जलयात्रेचा समारोप करण्यात आला. जलयात्रेच्या अग्रभागी रथात स्वार शाकंभरी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी गर्दी केली होती.
भक्तीगीताच्या तालावर ठेका धरत अभुतपूर्व उत्साहात मंगळवारी (दि.7) जलयात्रा पार पडली. जलयात्रेनंतर दुपारी 1.30 वाजता तुळजाभवानी मातेच्या दही दुध पंचामृत अभिषेक पुजेस प्रारंभ करण्यात आला, त्या नंतर देवीची शेषशाही अलंकार पूजा मांडण्यात आली तर रात्री छबिना मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान जलयात्रेनंतर प्रक्षाळ मंडळाच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा 10 हजार भाविकांनी लाभ घेतला.
शाकंभरी नवरात्र महोत्सवाचे यजमान संजय जेवळीकर यांनी सपत्नीक इंद्रायणी देवीच्या आरतीने जलयात्रेला प्रारंभ करण्यात आला. या वेळी महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा यांच्यासह मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे, धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, जयसिंग पाटील, विश्वास कदम, नागेश शितोळे, राजकुमार भोसले, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, उपाध्यक्ष विपीन शिंदे, किशोर गंगणे, प्रक्षाळ मंडळाचे विशाल रोचकरी, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, मकरंद प्रयाग, श्रीराम अपसिंगेकर, गिरीश देवळालकर, भोपे पुजारी मंडळाचे अमर परमेश्वर, अजित क्षीरसागर आदींसह प्रक्षाळ मंडळाचे सदस्य, पुजारी, भाविक, आराधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top