लोहारा/प्रतिनिधी-
लोहारा तालुक्यातील जेवळी परिसरात शेती क्षेत्राला होणारी रात्रीची वीज पुरवठा ही शेतकऱ्यासाठी मोठ्या अडचणीचे ठरत असून ही वेळ बदलून शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा, अन्यथा याबाबत आंदोलन छेडण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी लोहारा येथील वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे  निवेदनाद्वारे दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, जेवळी व परिसरात सध्या या भागात शेती क्षेत्राला रात्री आठ ते सकाळी सहा पर्यंत वीज पुरवठा केला जात आहे. परंतु ही वेळ शेतक-यासाठी मोठ्या अडचणीचे ठरत आहे. शेतकरी कुटुंबांना यासाठी रात्री अंधारात व थंडीत जागून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. यातून साप, विंचू, जंगली शॉपद यापासून जीवाला धोका निर्माण झाला आहे. एकीकडे शासनाने शेतक-यांना विविध सेवा सवलती देण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे प्रत्यक्षात प्रत्येक बाबतीत शेतक-यांची हेळसांड होताना दिसून येत आहे. यंदा शेवटच्या टप्प्यात झालेल्या सततच्या पावसाने शेती फडात मोठ्या प्रमाणात तन- झुडपे वाढली असून त्याची काढणे कोळपणी करून पेरणी करण्यात शेतकरी गुंतला आहे. यामुळे यंदा पेरणीला उशीर होत असल्याने फडातील ओलावा झपाट्याने कमी होत असून फडात पाणी सोडल्याशिवाय उगवत नसल्याने चित्र आहे. परंतु विज कंपनीच्या तुघलकी कारभारामुळे शेतक-यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रात्रीच्या होणा-या वीजपुरवठ्याने पाणी उपलब्ध असतानाही पिकांना पाणी देता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून कनिष्ठ अभियंता पद हे रिक्तच आहेत. सध्या पाणी उपलब्धतेमुळे शेती क्षेत्रात विजेची मागणी वाढल्याने वीज पुरवठा हेे कमी व खंडित स्वरूपात होत आहे. तसेच यातून ट्रांसफार्मर नादुरुस्त होण्याचे प्रमाणही वाढलेे आहे. या वीज पुरवठ्या संबंधित अडचणी कोणासमोर मांडावा असा प्रश्न निर्माण होत आहे. तरी येथे त्वरित कनिष्ठ अभियंता पद भरावे तसेच सारासार विचार करून शेती क्षेत्राला दिवसा पाणीपुरवठा करावी अन्यथा आम्हाला नाविलाजाने आंदोलन करावा लागेल, असा इशार या निवेदनात शेतकऱ्यांनी दिला आहे. या निवेदनावर आशिष साखरे, अनिल पाटील, विवेकानंद बिराजदार, सुधीर कोरे, शिवकांंत होणाजे, यांच्यासह 62 शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
 
Top