उस्मानाबाद /प्रतिनिधी -
 निस्वार्थ भावनेने केलेली समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. त्यामुळे अशी ईश्वरसेवा करणा-या लोकांपासून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी समाजातील गरजू घटकांना मदत करावी असे आवाहन भगवान महाराज आनंदगडकर यांनी आज केले.
उस्मानाबाद येथे लोकसेवा समितीच्या वतीने उत्कृष्ट समाजसेवा करणा-या व्यक्तींचा लोकसेवा पुरस्कार देऊन भगवान महाराज आनंदगडकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकसेवा परिवाराचे प्रमुख अॅड. मिलिंद पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून शेषाद्री डांगे, कमलाकर पाटील, सौ. सुषमा पाटील,डॉ अभय शहापुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकसेवा समितीच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त उत्कृष्ट समाजसेवा करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात येतो.
  बुधवार, 25 डिसेंबर रोजी येथील स्व. प्रमोद महाजन सांस्कृतिक सभागृहात हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. मिलिंद पाटील म्हणाले की, लोकसेवा समितीच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून समाजात उत्कृष्ट सेवा करणा-या व्यक्ती आणि संस्थांचा सत्कार करण्यात येतो. निस्वार्थ भावनेने समाजसेवा करणा-या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव म्हणजे ईश्वराची सेवा केल्यासारखा आनंद होतो असे मत ही अॅड.पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी औरंगाबाद येथील प्रसिद्ध समाजसेवक राजकुमार खिवंसरा, सौ. सुशील रघुवीर व रघुवीर ओक तसेच उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकाला गेल्या चार वर्षापासून जेवणाची व्यवस्था करणारे अन्नपूर्णा ग्रुप यांना यावर्षीचा लोकसेवा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजकुमार खिवंसरा, सौ सुशील रघुवीर व रघुवीर ओक व उस्मानाबाद येथील अन्नपूर्णा ग्रुपचे अतुल अजमेरा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. अभय शहापूरकर तर सूत्रसंचालन प्रभारी प्राचार्य प्रशांत चौधरी यांनी केले यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध मान्यवर, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   

 
Top