उमरगा/प्रतिनिधी-
अभिजात साहित्य मंडळ, उमरगा या मंडळातर्फे एक पुस्तक एक महिना हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.  या उपक्रमांतर्गत सहभागी वाचकांनी एका महिन्यात किमान एक पुस्तक वाचायचे आणि वाचलेल्या पुस्तकाबद्दल स्वत:चे मत नोंदवायचे. म्हणजे त्या पुस्तकाची समीक्षा लिहायची. आणि ते व्हाट्सअप ग्रुपवर शेअर करायचे. असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. सातत्याने गेली वर्षभर हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमात ज्या सदस्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचली त्या सदस्यांना वाचकवीर हा पुरस्कार देऊन नुकताच त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक लक्ष्मण बिराजदार हे उपस्थित होते तर अभिजात साहित्य मंडळाचे अध्यक्ष बालाजी मदन इंगळे हे  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात सुरेखा नारायणकर - चौगुले, उषा गाडे - इंगळे, पुष्पलता पांढरे, रेखा सूर्यवंशी, सुवर्णा जगताप -थोरे या वाचकांना वाचकवीर हा पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले. तसेच शुभदा पोतदार, कमलाकर भोसले, प्रमोद मोरे, शंकर मुगळे या वाचकांना प्रोत्साहनपर वाचकवीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वाचक वीर पुरस्कार प्राप्त वाचकांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुणे प्रा. लक्ष्मण बिराजदार यांनी यावेळी वाचकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक शिवराम अडसुळे, केंद्रप्रमुख सुशिलकुमार चौगुले, राहुल सोनवणे आदीसह वाचक उपस्थित होते.
 
Top