आ.कैलास पाटील यांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन  
उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्ह्यात मंजूर झालेल्या चारशे वितरण रोहित्रांना निधी उपलब्ध करून द्यावा, बंद असलेली विजेची जोडणी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याबाबत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात मराठवाडा पॅकेज अंतर्गत चारशे विद्युत रोहित्र मंजूर झाले आहेत. मात्र निधीअभावी हे काम झाले नाही, त्यामुळे जिल्ह्यात रोहित्र निकामी होण्याचे प्रमाण वाढले आहे. चार वर्ष दुष्काळ होता. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे, मात्र रोहित्र नसल्याने अनेक शेतक-यांचे विद्युत पंप सुरु होत नाही, त्यामुळे वीज जोडणी असतानाही शेतक-यांची पिके करपत आहेत. शिवाय जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून नवीन वीज जोडणी देण्याचे बंद करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात अनेक शेतक-यांनी नव्याने विहिरी, कूपनलिका खोदल्या आहेत. मात्र विद्युत जोडणी मिळत नसल्याने शेतक-यांचे आर्थिक नुकसान होत आहे .सौरपंप मिळत नाहीच शिवाय अन्य योजनातुनही शेतक-यांना वीज जोडणी मिळत नाही, पदरमोड करीत शेतक-यांना वीज जोडणी घेण्याचे आव्हान केले जात आहे .त्यामुळे शेतक-ांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.
मराठवाडा पॅकेज अंतर्गत मंजूर असलेल्या 400 वितरण रोहित्रांना निधी उपलब्ध करून द्यावा तसेच नवीन विद्युत जोडणी सुरू करावी,अशी मागणी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे उपनेते  तथा आमदार प्राध्यापक तानाजी सावंत उपस्थित होते.

 
Top