उस्मानाबाद/प्रतिनिधी -
 संत गोरोबा कुंभारांच्या वास्तव्याने पावन परिसरात होत असलेल्या 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आकार देण्यासाठी राज्यातील कुंभार समाज बांधवही एकवटले आहेत. संमेलन साकारण्यासाठी समाजातर्फे निधी संकलित करून पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. सोमवार, 30 डिसेंबर रोजी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या पदाधिका-यांनी हा निधी संमेलन संयोजन समितीकडे सुपुर्द केला.
उस्मानाबाद येथे 10, 11 व 12 जानेवारी 2020 रोजी 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. या संमेलनाला हातभार म्हणून महिनाभरापूर्वीच कुंभार विकास संघाने मदतीसाठी पुढाकार घेतला होता. राज्यभरातील कुंभार बांधवांकडून यथाशक्ती निधी संकलित करुन ही रक्कम संमेलनासाठी देण्याची घोषणा संघाच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर निधी संकलनाच्या कार्यास प्रत्यक्ष सुरूवात करुन राज्यातील कुंभार बांधवांनी एकुण 5 लाख रूपयांचा निधी जमा केला. ही रक्कम सोमवारी कुंभार समाजबांधवांच्या वतीने साहित्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली.
यावेळी अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन जगदाळे, प्रदेशाध्यक्ष श्यामराव कुंभार राजे, महाराष्ट्र माती कला महामंडळाचे सदस्य नागनाथ कुंभार, कुंभार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव खटावकर, युवक जिल्हाध्यक्ष पांडुरंग कुंभार, सचिव नामदेव कुंभार, राजकुमार कुंभार, कृष्णा कुंभार, रेवणसिद्ध लामतुरे, संमेलनाचे सहकार्यवाह प्रशांत पाटील, अग्निवेश शिंदे, कार्यकारिणी सदस्य आशिष मोदाणी, बालाजी तांबे, राजेंद्र अत्रे, एस. डी. कुंभार, सुभाष चव्हाण आदींची उपस्थिती होती.
 
Top