उस्मानाबाद/प्रतिनिधी -
सरसकट कर्जमाफी व 25 ते 50 हजार नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर उद्धव ठाकरे यांनी केली होती. आता दोन्ही घोषणा पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे आता यासाठी सर्वांच्या सोबतीने लढा उभारण्यात येईल, अशी माहिती भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री होण्याअगोदर एक महिनाभर औरंगाबादसह मराठवाड्यातील अन्य भागाचा दौरा करताना उद्धव ठाकरे यांनी  अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी अटी शर्ती बाजूला ठेवा, मोजपट्ट्या, फूटपट्ट्यानंतर लावा आणि तातडीची मदत म्हणून हेक्टरी 25 ते 50 हजार रुपये द्या  अशी मागणी केली होती. आपले सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे वचन देतो, असेही ते म्हणाले होते. निवडणुकीमध्ये देखील शेतक-यांचा सात बारा कोरा करण्यासह शेतकरी कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करण्याची घोषणा केली होती. परंतु, आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून केवळ दोन लाख कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. आज स्थगित करण्यात आलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये संपूर्ण कर्जमुक्तीसह पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी 25 ते 50 हजार रुपये मदतीच्या घोषणेची सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु, प्रचंड अडचणीत असलेल्या शेतक-यांना नुकसान भरपाई तर दिलीच नाही, परंतु सरसकट संपूर्ण कर्जमाफी देखील केली नाही. त्यामुळे पुढील काळात सरकारला त्यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून देत शेतक-यांच्या साथीने संपूर्ण व सरसकट कर्जमाफीसह पावसामुळे झालेल्या नुकसनीपोटी 25 ते 50 हजार प्रति हेक्टरी अनुदान मिळावे यासाठी लढा उभारण्यात येईल, अशी घोषना आमदार पाटील यांनी केली आहे.

 
Top