उस्मानाबाद/प्रतिनिधी-
राज्य परिवहन महामंडळांतर्गत कामे अर्धवट असताना ती कामे पूर्ण झाल्याचे खोटे रेकॉर्ड तयार करून एसटी महामंडळाची 19 लाख 82,730 रुपयांची फसवणूक करून सदरील रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन विभागीय अभियंत्यासह स्थापत्यच्या कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणातील आरोपी गणेश सदाशिव राजगिरे (तत्कालीन विभागीय अभियंता) व राहुल भारत पवार (कनिष्ठ अभियंता स्थापत्य शाखा) हे दि.1 सप्टेंबर 2017 ते 30 मार्च 2019 दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभागीय कार्यालयात कार्यरत होते. यावेळी सदरील दोघांनी त्यांच्या अधिकार व पदाचा गैरवापर करून राज्य परिवहन विभाग, उस्मानाबाद येथील कामे अर्धवट करून ते पुर्ण केल्याचे चुकीचे रेकॉर्ड तयार केले. याद्वारे त्यांनी एसटी महामंडळाचा 19 लाख 82,730 रुपयांचा अपहार करून फसवणूक केली. ही बाब समोर आल्यानंतर सुरक्षा व दक्षता अधिकारी दीपक जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे. 
 
Top