उस्मानाबाद / प्रतिनिधी -छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता चौथीच्यावर्गातील विद्यार्थीनी सफल रवींद्र केसकर हिने कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांचे हाल पाहून स्वतःच्या वाढदिवसावर होणारा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत केली आहे. अन्न, पाण्यावाचून लहान मुले, महिला आणि नागरिकांचे पुरामुळे होणारे हाल पाहून सफलला रडू कोसळले आणि येत्या 23 तारखेला मोठ्या आनंदाने साजरा होणार्‍या वाढदिवसावर आई-वडिलांनी खर्च न करता तिने लहान वयात दाखविलेल्या सामाजिक जाणिवेचे सर्वत्र कौतूक होत आहे.
सफल केसकर ही मागील दोन दिवसांपासून टीव्हीवर कोल्हापूर व सांगलीसह राज्यातील अन्य ठिकाणच्या पूरग्रस्तांचे होणारे हाल पाहत होती. लहान मुले, महिलाचे अन्नपाण्यावाचून होणारे हाल, पाण्यात वाहत जाणार्‍या नागरिकांचे हाल पाहून तिच्या हळव्या मनाला रडू कोसळले आणि आपण काय करू शकतो का? असा विचार तिच्या मनात आला. योगायोगाने तिला शुक्रवारी रात्री डी-मार्टला जायचे होते. तिने आई भाग्यश्री केसकर व वडील रवींद्र केसकर यांच्याजवळ माझ्या वाढदिवसावर खर्च नाही केला तरी चालेल. परंतु पूरग्रस्तांना मदत करू, अशी इच्छा व्यक्त केली. आई-वडिलांनीही तिच्या इच्छेची कदर करून तिच्या मनावर डी-मार्टमधून कपडे, खाऊ, लहान मुलांना देण्यासाठी दूध पावडर, अंथरूण, पांघरूणाचे कपडे खरेदी केले. आता हे खरेदी केलेले साहित्य जिल्हा प्रशासनामार्फत ती कोल्हापूर व सांगलीला पाठविणार आहे.
काय दिले सफलने पूरग्रस्तांसाठी?सफलने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 50 नवीन ब्लँकेट, 50 टॉवेल्स, 50 नवीन कानटोप्या, 50 नवीन साड्या, 50 राजगिरे लाडूचे मोठे पॅक, 50  एक किलोचे भंडंग पॅकेट, 50 मोठे नमकीन बिस्कीट पॉकेट्स, 50 दूध पावडर पॉकेट्स, 50 डेटॉल साबण, 50 नवीन शाली, याव्यतिरिक्त घरातील न वापरलेले चांगले कपडे, ओढण्या, साड्या, लहान मुलीचे कपडे, स्वेटर, सतरंजी, चादर, बेडशीट हे सारे साहित्य आज व्यवस्थित पॅक करून ठेवले आहे. तिच्या मानाने एवढे देवूनही तिने आपण जास्त काहीच दिले नाही, असे तिला वाटते. परंतु माणसाने माणसाशी माणसासम वागणे, या उक्तीप्रमाणे तिने वागण्याचा प्रयत्न करून अनेकांना आदर्श घालून दिला आहे. 
 
Top