प्रतिनिधी / भूम-
तालुक्यातील पाटसांगवी येथे ग्रामपंचायतच्या पाणी फाउंडेशनच्या निधीत अफरातफर केल्याचा ठपका ठेवत ग्रामसेवक व्ही. एन. घोडे यांना निलंबित करण्यात आले.
पाटसांगवी येथील सरपंच लक्ष्मण किलमिसे यांनी ग्रामसेवकाने पानी फाउंडेशनकडून मिळालेली बक्षिसाची रक्कम परस्पर उचलून अफरातफर केल्याची तक्रार गटविकास अधिकारी राजू कांबळे यांच्याकडे केली होती. पानी फाउंडेशनमध्ये 2016-17 मध्ये गावाने सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये ग्रामपंचायतने तालुक्यात दुसरा क्रक्रमांक मिळविला होता. शासनाकडून या ग्रामपंचायतला 9 लाख 668 रुपये बक्षीस स्वरुपात निधी मिळाला होता. तो निधी वेळेत खर्च करून त्यानुसार मूल्यांकन करणे गरजेचे होते. मात्र ग्रामसेवकाने त्या खर्चाच्या नोंदी व कामाचे मुल्याकंन करून घेतले नाही.ही माहिती चौकशी पथकाकडे सादर करण्यात आली नाही. तसेच या ग्रामसेवकाने रजेवर असल्यावर पदभार हस्तांतरण न करणे, ग्रामपंचायतचे रेकॉर्ड जतन न करणे,चौकशी कामी प्रत्यक्ष हजर न राहणे, असा ठपका ठेवत चौकशी पथकाने व्ही.एन.घोडे यांना दोषी ठरवले होते. त्यामुळे घोडे याना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील नियम 3 चा भंग केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे.
 
Top