प्रतिनिधी /उस्मानाबाद-
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०१९ साठी विमा हप्ता भरण्याकरिता २४ जुलै २०१९ अंतिम तारीख अाहे. परंतु, पावसाअभावी लांबलेल्या पेरण्या व तलाठ्याच्या कमी संख्येमुळे सातबारा देण्यासाठी होत असलेला विलंब लक्षात घेऊन विमा हप्ता भरण्यासाठी १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्याकडे केली आहे.
मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये अत्यल्प पाऊस झाला असल्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत. तसेच पीकविमा हप्ता भरण्यासाठी तलाठ्याने प्रमाणित केलेला सातबाराच ग्राह्य धरण्यात येत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मागणी करूनही वेळेत सातबारा उपलब्ध झालेला नाही. शेतकरी खातेदाराची संख्या व उपलब्ध तलाठी यामध्ये मोठी तफावत असून सातबारा न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी पीकविम्याचा हप्ता भरू शकलेले नाहीत. उस्मानाबाद तालुक्यातील ८८५८९ खातेदारापैकी आतापर्यंत केवळ ५२३०० खातेदारानांच सातबारा उपलब्ध करून देण्यात आला. जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी हिच परिस्थिती आहे. अर्ज अपलोड न होणे, संकेतस्थळाचा वारंवार बिघाड यामुळे विमा हप्ता भरण्याकरिता १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढीकरीता प्रस्ताव शिफारसीसह केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पाठवावा अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कृषीमंत्री बोंडे यांच्याकडे केली आहे.
आमदार पाटील यांची कृषिमंत्र्यांकडे मागणी 
 
Top