| प्रतिनिधी /तेर - पुरातन संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या तगर (तेर ) नगरीचे नवव्या वेळेस उत्खनन होणार आहे. त्या अनुशंगाने दोन स्थळांची औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या पथकाने पाहणी केली आहे. तेर येथे संत गोरोबा काकांच्या मंदिराच्या अगदी जवळ तेरणा नदीच्या शिखर गल्ली लगत नदीच्या तिरावर तीन वर्षापूर्वी पाणी टंचाईच्या काळात एक जुनाट खड्डा खोदला होता. कालांतराने या खड्यातील वाळू ढासळल्याने यामध्ये विटांचे बांधकाम असलेले अवशेष आढळून आले होते. या शिवाय जळालेल्या अवस्थेत रचलेले लाकडे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. तेर येथील कै. रामलिंगप्पा लामतुरे पुराणवस्तू संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे यांनी जानेवारी २०१९ मध्ये औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाला या संदर्भात पत्राद्वारे कळविले होते. तसेच उस्मानाबाद- तेर- पानवाडी - औसा या रस्त्याच्या बांधकामातही सातवाहन कालीन वस्तू आढळून आल्या आहेत. या दोन्ही ठिकाणांची पहाणी शनिवारी (दि.१८) औरंगाबाद येथील पुरातत्व खात्याच्या तंत्र सहाय्यक निलीमा मार्कंडेय, समन्वयक मयुरेश खडके, ओजस बोरसे, सहाय्यक अभिरक्षक अमोल गोटे यांनी पाहणी केली. दरम्यान, या पुरातन स्थळांचा अहवाल राज्य सरकारकडे तातडीने पाठविण्यात येणार असून तो अहवाल राज्य शासन केंद्र सरकारकडे पाठवेल. त्यांच्या मंजुरीनंतरच उत्खनन करण्यात येणार असल्याचे समन्वयक मयुरेश खडके यांनी सांगितले. यापूर्वी आठदा उत्खनन तेर व परिसरात १९५८ पासून २०१५ पर्यंत आठ वेळेस उत्खनन करून तेरची प्राचीन संस्कृती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आता या नवीन पाहणीनुसार राज्य व केंद्र शासनाची परवानगी मिळाल्यानंतर येथे नवव्यांदा उत्खनन होणार आहे. |
