काटी /प्रतिनिधी -
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील ग्रामदैवत समाधिस्थ योगी श्री बोधगिरी महाराज संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित श्री ग्रंथपारायण व
अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची मोठ्या भक्तीमय वातावरणात सांगता झाली.
भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामदैवत समाधिस्थ योगी श्री बोधगिरी महाराज संजीवनी समाधी सोहळ्या निमित्त आयोजित या सप्ताहाची सुरुवात गुरुवार दि.(25 ) एप्रिल रोजी हभप काकासाहेब पाटील यांच्या हस्ते कलश पुजन, विष्णू पुजन, ज्ञानेश्वरी ग्रंथराज पुजन करुन प्राण प्रतिस्थापना करुन झाली होती. या सप्ताहात दररोज काकडा, श्रीची पुजा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, भजन, प्रवचन, हरिपाठ, किर्तन, हरिजागर आदी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दररोज वेगवेगळ्या भाविकांच्या वतीने अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 25 एप्रिल पासून सुरू असलेल्या श्री ग्रंथपारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची गुरुवार दि.( 2 ) मे रोजी मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. प्रारंभी मारुती मंदिरापासून गावातून बालगोपाल समवेत ग्रामस्थांनी टाळ मृदुंगाच्या तालात ज्ञानेश्वरी पारायन ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या सप्ताह कालावधीत दररोज रात्री विविध कीर्तनकारांनी भाविकांना समाज प्रबोधन केले. तर शुक्रवारी दुपारी ग्रंथदिंडी नगरप्रदक्षिणा झाल्यानंतर हभप गुरुवर्य प्रभाकर ( दादा ) बोधले महाराज महाराज ( तिर्थ क्षेत्र पंढरपूर) यांचे काल्याचे किर्तन संपल्यानंतर दहिहांडी कार्यक्रम घेऊन भक्तांना महाप्रसादाच्या वाटपाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. तसेच शुक्रवार दि. 3 मे रोजी सायंकाळी साडेआठ वाजता सुधाकर गवळी यांचा भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.
अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी येथील भजनी मंडळ व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.