प्रतिनिधी / उस्मानाबाद
|
शहरात तीव्र पाणीटंचाई असताना उजनी योजनेसाठी टेंपरप्रूफ व्हॉल्ववर मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही पाणी गळती रोखण्यात पालिका अपयशी ठरली असून, मुबलक पाणी आणि वीज उपलब्ध असतानाही उस्मानाबादकारांवर तहानेने व्याकुळ होण्याची वेळ आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिकेवर केला आहे. राष्ट्रवादीचे गटनेते युवराज नळे,माणिक बनसोडे, अमित शिंदे, अभय इंगळे, गणेश खोचरे, अभिजित काकडे, संदीप साळुंखे, नाना घाटगे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार उजनी योजनेच्या मार्गाची पाहणी केली. यावेळी बदललेल्या टेंपर प्रुफ व्हॉल्ववर मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही या व्हॉल्व्हला गळती लागल्याचे आढळून आले. शहराची लोकसंख्या १.३० लाख गृहित धरली तर दररोज ८ एमएलडी पाणी लागते.मात्र पालिकेला पाणी गळती थांबवण्यात आलेल्या अपयशामुळे उजनी धरणात मुबलक पाणी असताना देखील शहरवासीयांना पंधरा ते वीस दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केले तरीही शहराच्या पाण्याची घडी नीट बसलेली नाही.याला नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा हलगर्जीपणा व गलथान कारभार कारणीभूत आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात नगरपालिका असताना जलवाहिनीला एखाद्या ठिकाणी गळती लागल्याचे समजल्यावर आ.राणाजगजीतसिंह पाटील याबाबत तातडीने उपाययोजना करण्याबाबत संबंधितांना सूचना करायचे व त्यावर तात्काळ कार्यवाही केली जात होती. अनेकदा रात्र रात्र जागून काढत दुरुस्ती केली जायची व गळती थांबवली जायची.आता मात्र ६ -६ महिने गळती थांबवली जात नाही हे दुर्दैवी आहे. काही दिवसांपूर्वी पत्र परिषद घेऊन नगराध्यक्षांनी आता १३० टेम्पर प्रूफ व्हॉल्व्ह बसविण्यात आले असल्याने गळती पूर्णतः रोखण्यात येईल व १ मे पासून नियमित पाणीपुरवठा करू असा देखील दावा केला होता. नागरिकांना पाणी असताना वेळेवर का दिले जात नाही याची शहानिशा व्हावी, यासाठी आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पुन्हा एकदा जलवाहिनीची पाहणी करण्याच्या सूचना केल्या होत्या.गुरूवारी नगरसेवक अभय इंगळे,अभिजित काकडे व संदीप साळुंखे यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता नोहेंबर २०१८ मध्ये असलेली परिस्थिती आजही कायम असल्याचे दिसून आले. त्यावेळी ज्या ठिकाणी गळती होत होती तिथेच आजही मोठ्या प्रमाणात गळती असल्याचे दिसून आले.आश्चर्याची बाब म्हणजे टेम्पर प्रूफ व्हॉल्व्ह जेथे बसवले आहेत अशा ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे दिसून आले.त्यामुळे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने व गळती रोखण्यासंदर्भात दाखवलेल्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.नुकतेच बसवलेले टेम्पर प्रूफ व्हॉल्व्हची जर गळती होत असेल तर याची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भात आम्ही मागणी करणार आहोत. |