उस्मानाबाद/प्रतिनिधी-  
कृषी निविष्ठा विक्रेता/वितरक/निविष्ठा साठवणूक केंद्रधारकांनी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा,असे आवाहन खरीप हंगाम 2019 पूर्वतयारीच्या अनुषंगाने कृषी निविष्ठा विक्रेता/वितरक/निविष्ठा साठवणूक केंद्रधारक आणि गुणनियंत्रण निरीक्षक यांच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी काल (दि.8मे रोजी )येथे केले.
                   यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे उस्मानाबाद जिल्हयातील कृषी निविष्ठा विक्रेते/वितरक/निविष्ठा साठवणूक केंद्रधारक आणि गुणनियंत्रण निरीक्षक यांची जिल्हास्तरीय प्रशिक्षण व आढावा बैठक संपन्न झाली,त्यावेळी त्या बोलत होत्या.
          यावेळी या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.उमेश घाटगे, कृषि विकास अधिकारी डॉ.टि.जी.चिमनशेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          जिल्हाधिकारी श्रीमती मुधोळ-मुंडे म्हणाल्या, शेतकऱ्यांना निविष्ठा विक्री करत असताना विक्रेत्यांनी चांगले मार्गदर्शन करणे आवश्यक आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा अनावश्यक खर्च वाढणार नाही. शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार बियाणे/खते/किटकनाशके मिळायला हवे, शेतकऱ्यांना त्यांनी वापरलेल्या निविष्ठांचा लाभ व्हायला हवा,जिल्हयात कोणत्याही प्रकारचे बोगस उत्पादन येणार नाही, येत असल्यास प्रशासनास कळवावे, प्राथमिक स्तरावर निकृष्ठ/ बोगस उत्पादने थांबविणेबाबत विक्रेत्यांनी सहकार्य करावे.  तसेच शेतकऱ्यांना बोगस निविष्ठा विक्री करू नये,असे करणाऱ्याचा व्यवसाय बंद करण्यात येईल, निरीक्षकांनी सर्तक राहून गुणनियंत्रणाचे काम करावे अन्यथा कारवाई केली जाईल, मान्यता असलेले पी.जी.आर.बायोफर्टीलायझर्स विक्री करण्याचे सूचित करुन शेवटी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा,असेही श्रीमती मुधोळ- मुंडे यांनी सांगितले.    
                   मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी योग्य दर्जाच्या कृषी निविष्ठांचा पुरवठा करावा. नियुक्ती करण्यात आलेल्या जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकाने सजगपणे नजर ठेवून बोगस, संशायास्पद कृषी निविष्ठा आढळून आल्यास संबधितावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे आवाहन केले.
          जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. उमेश घाटगे  यांनी कृषी निविष्ठा / विक्रेते / वितरक तसेच निरीक्षकांनी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक निविष्ठा पुरवठयासाठी सर्वानीच प्रमाणिकपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे सांगितले.
          कृषी विकास अधिकारी डॉ.टि.जी.चिमनशेटे यांनी उपस्थितांना खते / बियाणे /  किटकनाशक कायदे व परवानाबाबत सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले.
          कृषी उपसंचालक श्री.सुभाष चोले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.आभार प्रदर्शन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय श्री.सी.जी.जाधव यांनी केले.
          या कार्यक्रमास कृषी विभागाचे अधिकारी –कर्मचारी, जिल्हयातील कृषी निविष्ठा विक्रेते/वितरक/निविष्ठा साठवणूक केंद्रधारक आणि गुणनियंत्रण निरीक्षक,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top