प्रतिनिधी / उस्मानाबाद
मद्य प्राशन करून त्रास देणाऱ्या मुलाचा आईने डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून झोपेतच खून केल्याची घटना तालुक्यातील समुद्रवाणी येथे मंगळवारी (दि. २) सकाळी उघडकीस आली. ही घटना मध्यरात्री घडली असून, सकाळी उठून आई नातेवाइकांच्या गावी निघून गेली. मात्र, संशयावरून नातेवाइकांनी पोलिसांना संपर्क करून घराचे कूलूप तोडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आईला तीन तासात अटक केली. दरम्यान, मध्यरात्री दीड वाजता मृताच्या भावाला त्याची किंकाळी ऐकू आली होती. मात्र, खून करणाऱ्या आईने त्याला काही नाही झोप, असे संागून प्रकार दडविण्याचा प्रयत्न केला. 
राम महादेव कावळे (वय ३५), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. व्यवसायाने टेलर असलेल्या रामला अलीकडे दारूचे व्यसन जडले होते. त्याच्या व्यसनाला कंटाळून त्याची पत्नी दोन्ही मुलांसह अनेक महिन्यांपूर्वी माहेरी निघून गेली होती. राम आणि त्याची आई हिरकणाबाई कावळे दोघेच घरी राहत होते. 
रामचे दोन्ही मोठे भाऊ कुंडलीक आणि बालाजी शेजारीच विभक्त राहत आहेत. राम गेल्या काही दिवसांपासून दारू पिऊन आईसोबत वाद घालत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणने आहे. सोमवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला असावा, त्यानंतर आई हिरकणाबाई यांनी त्याच्या डोक्यात झोपेतच कुऱ्हाडीचे घाव घालून त्याचा खून केला असावा, असा कयास बांधला जात आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत कसून चौकशी सुरू केली असून, त्यानंतरच खरे कारण समोर येईल. तूर्त हिरकणाबाई यांनी मुलाचा खून केल्याची कबुली बेंबळी पोलिसांना दिली अाहे. 
मंगळवारी (दि. २) रात्री राम कावळे याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, घटनास्थळाला पोलिस उपविभागीय अधिकारी मोतीचंद राठोड, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक डी. एम. शेख यांनी तसेच इन्व्हेस्टिगेशन कार व आय बाईक पथकाचे सपोनि. संतोष थोरात, पोकॉ. व्ही. एस. घोंगडे, पोकॉ.पी. एस. कदम, पोकॉ. एम. यु. सय्यद, फोटोग्राफर हुमायुम शेख तसेच डॉग व स्कॉड प्रमुख स्वप्निल ढोणे आदींनी घटनास्थळी भेट दिली. 
 
Top