उस्मानाबाद,प्रतिनिधी-
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विविध प्रकारच्या पूर्वपरवानगी संबंधित शासन यंत्रणेकडून घेणे बंधनकारक आहे. यासाठी एक खिडकी पध्दती नुसार जिल्ह्यातील तालुकास्तरावर तहसिलदार कार्यालयामध्ये, उपविभागीय अधिकारी असणाऱ्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विशेष एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आला आहे,असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सांगितले आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्ते यांना निवडणूक प्रचारासाठी निवडणूक प्रशासनाकडून विविध प्रकारच्या पूर्वपरवानग्या लवकर मिळाव्यात यासाठी एक खिडकी कक्ष सुरु करण्यात आला आहे. या एक खिडकी कार्यालयात प्रचाराशी संबंधित विविध परवानग्या देणारे शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहून अर्जदारांकडून प्राप्त अर्जांवर नियमानुसार कार्यवाही करुन परवानगीचे प्रमाणपत्र देतील. अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे, ना-हरकत प्रमाणपत्र आणि दाखले असल्यास प्रशासकीय यंत्रणेस तातडीने कामकाज करण्यास मदत होईल.
उमेदवारांना प्रचारापूर्वी कोणत्या परवानग्या आवश्यक आहेत, निवडणूक आचारसंहिता काळात कोणत्या गोष्टींवर प्रतिबंध आहे,याची माहिती नामनिर्देशन अर्ज दाखल करताना देण्यात आलेली आहे. तसेच आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक नियमांचा विचार करुन विहित वेळेत प्रचाराच्या आवश्यक त्या पूर्वपरवानग्या घेतल्या जाव्यात. यामध्ये राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील स्टार प्रचारकांच्या दौऱ्याप्रसंगी वा अन्य विशेष प्रसंगी शासकीय यंत्रणेची मदत मिळावी, यासाठी स:शुल्क परवानगी दिली जाते. अशा विशेष प्रसंगांसह इतर बाबींच्या परवानगीसाठी देखील उमेदवारांनी किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी विहित कालमर्यादेत अर्ज दाखल करावा.
जिल्हयातील एक खिडकी कक्षांद्वारे केले जाणारे कामकाज आणि दिलेले प्रमाणपत्र यावर संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे नियत्रंण आहे. जिल्हास्तरावर एक खिडकी कक्षामध्ये पोलीस विभाग, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग आदींचे अधिकारी कार्यरत आहेत. एक खिडकी कक्षांद्वारे प्राप्त होणारे अर्ज आणि दिलेली प्रमाणपत्रे यांचा अहवाल नियमितरित्या निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि आचारसंहिता कक्ष यांना सादर केला जातो. या परवानग्या प्राप्त होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय, संबंधित उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आदींच्या ना-हरकत प्रमाण पत्रासह उमेदवारांनी अथवा त्यांच्या प्रतिनिधींनी अर्ज सादर करुन पूर्वपरवानगी घ्यावी.