प्रतिनिधी । कळंब -
कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रा महोत्सवात चुना वेचण्याच्या कार्यक्रमास मोठे अधिष्ठान आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातूनही लाखो भाविक शनिवारी (दि.20) श्री येडेश्वरी देवीचे दर्शन व चुना वेचण्याच्या कार्यक्रमासाठी येरमाळा नगरीत दाखल झाल्याने येरमाळा नगरी भाविकांच्या मांदीयाळीने फुलून गेली होती. प्रथम पालखी मंदिरातून गावात नेण्यात आली. तेथून हलगी,पखवाज, डोलकी, संबळाच्या वाद्यासह आई राजा उदो उदोच्या जयघोषात आमराईत आणण्यात आली.
तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण समजल्या जाणाऱ्या श्री येडेश्वरी देवीस महाराष्ट्रात येडाई या नावानेही ओळखले जाते. तब्बल आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेतील मुख्य चुना वेचण्याचा कार्यक्रम शनिवारी होता. यानिमित्ताने शुक्रवारीपासूनच येरमाळा येथे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही देवीचे भक्तगण येरमाळा नगरीत दाखल होत होते. या दिवशी येडाईच्या डोंगरावरील येडेश्वरी मंदिर ते राष्ट्रीय महामार्गालगतची आमराई यादरम्यान पालखीच्या मिरवणुकीसह विविध पारंपरिक कार्यक्रम पार पडले. सकाळी 8 वाजता पालखीचे चुन्याच्या रानाकडे येडेश्वरी मंदिरातून प्रस्थान झाले. यावेळी आई राजा उदो उदोचा जयघोष करत संभळ, झांज व हलगीच्या तालावर ठेका धरत भाविकांचे पाय मोठ्या तल्लीनतेने पालखीसमोर थिरकत होते. सकाळी साडे दहाच्या सुमारास पालखीचे गावात आगमन झाले. यानिमित्ताने प्रत्येकांनी पालखी मार्गावर सड्याची शिंपण करून आकर्षक रांगोळी काढून पालखी मार्गावर फुलांची अंथरण केली होती. यामुळे प्रफुल्लित झालेल्या वातावरणात अबालवृद्धांसह येरमाळा ग्रामस्थ या पालखीचे स्वागत करताना दिसून आले. त्यानंतर पालखी 11 वाजता चुन्याच्या रानात पोहचल्यावर तेथे जमलेल्या लाखो भाविकांनी चुन्याचे पाच खडे वेचून पालखीवर टाकले. पोलिसांनी पालखीला केलेले संरक्षण कडे, पालखीपुढे बैलांची सजावट करुन चालणाऱ्या बैलगाडीतून भविकांना सूचना देणाऱ्या स्पीकरचा आवाज कानी पडताच भाविक हरवून जात आई राजा उदो उदोच्या गजर करत हात उंचावून पालखीचे दर्शन घेत होते. भक्तीचा हा अनोखा नजारा अंगावर शहारे उभारत होता.


 
Top