प्रतिनिधी । उस्मानाबाद  -
 नळदुर्ग येथील किल्ल्यात शनिवार दि. 20 एप्रील रोजी बोरी नदीच्या पात्रात बोट पलटी होवून झालेल्या दुर्घटनेत तीन बालकांचा मृत्यू झाल्या प्रकरणी किल्ला चालविण्यास घेतलेल्या युनिटी मल्टीकॉन व बोट चालविणाऱ्या अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहीतीनुसार महंमद शफीक अब्दुल हमीद जहागिरदार रा. मुंबई यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार किल्ला चालविण्यास घेतलेल्या आणि किल्ल्यात बोटींगचा व्यवसाय करणारी युनिटी मल्टीकाँन प्रा. लि. कंपनीचे मालक व बोट चालविणारा शाम वसंतराव गायकवाड या दोघांनी मिळून कसल्याही प्रकारची काळजी न घेता बोट मध्ये बसवून सदर बोट चालक याने बोट हयगयीने व निष्काळजीपणे चालवून पाण्यात पलटी झाल्यामुळे तीन मुलांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले अशी फिर्याद दिली आसल्याने युनिटी मल्टीकाँनचे मालक व बोट चालक शाम वसंतराव गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या दोघांनाही आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आसल्याची माहीती ही पोलिस सुत्राकडून मिळाली.
दरम्यान कालच्या किल्ल्यातील बोट दुर्घटनेत तीन बालकांचा दुर्दैवी अंत झाला आहे, त्यामुळे आता किल्ल्यातील बोरी नदीच्या पात्रात चालू असलेल्या बोटींगवर चांगल्या प्रशिक्षीत चालकांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी आता नागरीकांतून जोर धरत आहे. कारण या ठिकाणी बोरी नदीच्या पात्रात गेल्या दोन वर्षापासून नौका विहार केला जातो पंरतु या ठिकाणी चांगले प्रशिक्षीत नौका चालविणारे चालक असणे गरजेचे आहे. तरच भविष्यात अशा दुर्घटना होणे टळणार आहे शिवाय नौका विहार करताना जी काळजी घेतली जाते ती काळजी घेणे ही आता जरुरीचे झाले आहे.

 
Top