उस्मानाबाद /प्रतिनिधी-

 आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्याची आत्महत्या झाल्यानंतर तत्कालिन प्रधानमंत्री मनमोहनसिंग यांना यवतमाळला घेऊन गेलो. परिस्थिती पाहिली आणि देशातील शेतकऱ्यांना ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देऊन सरसकट कर्जमुक्त केले. आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महाआघाडीचे सरकार सत्तेत येण्याची गरज असून, सत्ता आल्यास सरसकट कर्जमाफी देऊ, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

 महाआघाडीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्रांगणात सोमवारी सायंकाळी शरद पवार यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
 सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. मात्र मोदी किंवा फडणवीस यांना शेतकऱ्यांचे काहीही देणेघेणे नाही. उठसूठ नेहरू-गांधींवर टीका सुरू आहे. आम्ही शेतकऱ्यांची परिस्थिती पाहून कर्जमाफीचा निर्णय घेतला. अवघ्या ८ दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले.त्यानंतर देशात कृषी उत्पादन वाढले. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची घेाषणा केली. मात्र, ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांना दक्षिणा द्यावी लागली. तरीही १०-१५ टक्के शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली नाही.
 मी कृषीमंत्री असताना शेतमालाला चांगला भाव मिळत होता. सत्तेत असलेले आताचे भाजपवाले तेव्हा भाववाढ झाल्यामुळे कांद्याच्या माळा गळ्यात घालून संसदेत आले. त्यांनी भाव कमी करण्यासाठी आंदोलन केले. मात्र आम्ही भाव कमी केले नाहीत. पिकवणारा टिकला तरच खाणाऱ्यांना खायला मिळेल, अन्यथा परदेशातून अन्नधान्याची आयात करावी लागेल, हे त्यांना पटवून संागितले. मात्र ते थंाबण्याच्या मनस्थितीत नव्हते. सध्या शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेले व्यक्ती आपल्याला निवडावे लागतील.
भाजपमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. उद्धव ठाकरेंनी पंढरपूरच्या सभेत शेतकऱ्यांबद्दल तळमळ व्यक्त केली होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आणि भाजपच्या गळ्यात गळे घातले.
 नरेंद्र मोदी म्हणतात, पवारांच्या घरात कटकटी वाढल्या आहेत. पण याची मलाच कल्पना नाही. आम्ही कुटंुबात ७ जण भाऊ, ४ बहिणी आहोत. आम्ही सर्वजण एकत्रित राहतो. एकमेकांना मदतही करतो. मोदी आमची तुम्ही काळजी करू नका. आम्हाला कुटंुब चांगले चालविता येते. तुम्हालाच कुटंुब चालविण्याचा अनुभव नाही. आम्हाला तोंड उघडायला लावू नका, अन्यथा आम्ही गावरान भाषेत उत्तरे देऊ, असा इशारा पवारांनी दिला.
 
Top