उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अंतर्गत निवडणूक खर्च संनियंत्रण समितीने राजकीय पक्ष व उमेदवारांच्या खर्चाबाबत बारकाईने लक्ष ठेवावे,असे निर्देश निवडणूक निरीक्षक (खर्च सनियंत्रण) पी. सुधाकर नाईक यांनी आज येथे दिले.
उमेदवाराच्या निवडणूक खर्च नियंत्रण कक्षाचे कामकाज सुरळीत व मुदतीत पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून आज दि.01 एप्रिल रोजी निवडणूक निरीक्षक (खर्च सनियंत्रण) पी. सुधाकर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी व कर्मचा-यांची खर्च नियंत्रण व देखरेख कार्यप्रणालीबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती,त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत निवडणूक निरीक्षक (खर्च सनियंत्रण) पी. सुधाकर नाईक यांनी मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षक, जिल्हा खर्च संनियंत्रण कक्षातील नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना मा.भारत निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी खर्चासंबंधीच्या वेळोवेळी प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चावर नियंत्रण ठेवणेबाबत, उमेदवारनिहाय खर्चाचे लेखे ठेवणे, छायांकीत निरीक्षण नोंदवही व पुराव्याचे फोल्डर जतन करणेबाबत योग्य ती कार्यवाही करणेबाबत निर्देश दिले.
या आढावा बैठकीस उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.प्रताप काळे, नोडल ऑफीसर कायदा व सुव्यवस्था तथा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, नोडल ऑफीसर खर्च नियंत्रण कक्ष श्री.शेखर शेटे, सहाय्यक नोडल ऑफीसर खर्च नियंत्रण कक्ष श्री. किरण घोटकर, संपर्क अधिकारी श्री.सचिन कवठे, व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.