उस्मानाबाद /
प्रतिनिधी-
उमरगा, लोहारा तालुक्यातील येणेगूर, दाळिंब, मुरूम, तुगाव, जेवळी, आष्टाकासार परिसराला मंगळवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपलं. यामुळे पपई, ऊस, डाळिंब, आंब्यांच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यात पावसाची नोंद ३४ मिमि झाली.मंगळवारी पहाटेच्या सुमारास वादळी वारा, मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा अवकाळी पाऊस सोमवारी रात्रीपासून अधूनमधून पहाटे पाचपर्यंत पडत होता. पहाटे पाचच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गारपीट चालू झाली. यावेळी अर्धा तास गारपीट झाली. या गारपिटीने फळबाग, आंबा, कलिंगड, पपई, ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.हा पाऊस व गारपीट तालुक्यातील येणेगूर, दाळिंब, मुरुम व तुगाव परिसराला कमी अधिक प्रमाणात आहे. परंतु यात तुगाव शिवारात गारपिटीने झालेल्या नुकसानीचे प्रमाण अधिक आहे. अनेकांच्या घर, गोठ्यावरील पत्रे उडाले असून शिवारात कडब्याच्या गंजी विस्कटल्या आहे. आंब्याच्या झाडांखाली कैर्‍यांचा सडा पडला आहे. शिवारात अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. शिवारात सर्वत्र मोठ्या प्रमाणात गारांचा थर साचला होता. सकाळी ९ पर्यंत गारा जशाच्या तशाच होत्या. तर पावसामुळे शिवारातील सखल भागात पाणी साचले असून बंधार्‍याचे नुकसान झाले आहे.दुष्काळी परिस्थितीत जगविलेल्या फळबागा उध्वस्त झाल्याने शेतकर्‍यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. फळबांगाची पाणझडी होवून झाडांचे खराटे झाले आहेत. यात मोठ्या प्रमाणात फळगळती झाली आहे. ज्वारी, ऊस भुईसपाट झाले आहे. दाळिंब महसूल मंडळ कार्यालयात या पावसाचे ३४ मिमी नोंद झाली आहे. यानंतर येथील तलाठी बालाजी बिराजदार यांनी नुकसानीचे पाहणी करुन वरिष्ठांना अहवाल दिल्याचे सांगितले.

 
Top