प्रतिनिधी/उस्मानाबाद
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या जिल्ह्यातील २०० उपद्रवी लोकांवर तात्पुरत्या स्वरूपाची हद्दपारी करण्यात आली असून, ६८ जणांवर किमान वर्षापर्यंतची हद्दपारी करण्याचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी दिली.
ते म्हणाले, बहुतांश भागात १८ तारखेला लोकसभेची निवडणूक असल्याने बंदोबस्तासाठी पोलिस ट्रेनिंग सेंटर तसेच जळगाव-धुळे या भागातून ८५० पोलिस कर्मचारी मागविण्यात आले आहेत. जिल्ह्यात १८०० पोलिस कर्मचारी आहेत. मात्र, राखीव तसेच तातडीच्या सुटीवरील कर्मचारीवगळता १३०० कर्मचारी निवडणुकीच्या ड्युटीवर असणार आहेत. म्हणजे एकूण २१५० पोलिस कर्मचारी त्यासोबत ६०० होमगार्डही ड्युटीवर असणार आहेत. अन्य जिल्ह्यातून ४० पोलिस अधिकारी बंदाेबस्तासाठी येणार आहेत. याध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षकांचा समावेश आहे. केंद्रीय राखीव दलाच्या दोन तुकड्या, राज्य राखीव दलाची एक तुकडी बंदाेबस्तासाठी तैनात असेल. निवडणुकी दिवशी येरमाळा आणि तुळजापूर येथील चैत्री यात्रा असल्याने बंदोबस्ताचे अितरिक्त नियोजन करण्यात आले आहे. निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार बुथनिहाय बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.
वॉरंटवरील ८०० जणांना पकडले, न्यायालयासमोर केले हजर कोर्टाकडून पकड वॉरंट असलेल्या सुमारे ८०० जणांना पकडण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक राजा यांनी दिली. ते म्हणाले, आचारसंहिता जाहीर झाल्यापासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १८०० जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेण्यात आले आहेत. फरार असलेल्या ३१ जणांना पकडून न्यायालयासमोर हजर केले. ७५० जणांचे शस्त्र जमा करण्यात आले अाहेत. साडेसहा हजार लिटर दारू जप्त केली असून, ७३ जुगाराच्या केसेस करून १८० आरोपींना अटक केली आहे. 
 
Top