उस्मानाबाद/प्रतिनिधी
 करारानुसार उसतोडीच्या कामाला मजूर पुरवले नसून ५ लाख ५० हजार रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी (दि.२७) परंडा पोलिस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल झाला. परंडा येथे राजेंद्र ढोरे (रा.शिराळा ता.परंडा) हे कारखान्यास ऊस पुरविण्याचे काम करत असून प्रेमसिंग राठोड (रा.शेदुरजना ता.मानोर जि.वाशिम) मुकादम आहे. राजेंद्र ढोरे हे भैरवनाथ शुगर वर्क्स लि.सोनारी येथील कारखान्यासाठी गळीत हंगाम २०१८-१९ मध्ये ऊस पुरविण्याबाबत करार केला होता. त्याअनुषंगाने ढोरे व राठोड यांच्यामध्ये १३ जुलै २०१८ रोजी परंडा येथे करार झाला व सदरील करारानुसार राठोड याने ढोरे यांच्याकडून १० कोयत्याच्या जोड्यासाठी करार केला. त्यानुसार ढोरे यांच्याकडून राठोड याने ५ लाख ५० हजार रुपये घेतले होते. मात्र, करारानुसार मजूर पुरविले नसून ढोरे यांची फसवणूक केली. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने ढेरे यांच्या फिर्यादीवरून राठोड याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. 
 
 
Top