सेनेतील बंडखोरी टळली, वरनाळेंनी घेतली माघार
प्रतिनिधी /उस्मानाबाद
खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या प्रा. गायकवाड गटाची समजूत काढण्यात महायुतीचे उमेदवार ओमराजेंना यश आले आहे. शुक्रवारी(दि.२९) सकाळी ओमराजेंनी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांची उमरग्यात जाऊन भेट घेतली. त्यानंतर प्रा.गायकवाड यांच्या गटाचे बसवराज वरनाळे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून, सेनेतील बंड टळले आहे. दरम्यान, अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी १९ पैकी ५ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता १४ उमेदवार रिंगणात उरले आहेत. शनिवारपासून सर्व उमेदवारांच्या प्रचाराची धूम सुरू होणार असून, १६ एप्रिलपर्यंत प्रचार सुरू राहील. महायुतीविरूद्ध महाआघाडी असा थेट सामना असला तरी वंचित बहुजन विकास आघाडीसह अन्य उमेदवारांचा परिणाम कोणावर, किती होणार, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे. उस्मानाबाद लोकसभेसाठी १८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून उमेदवार कोण, कोणाकोणात सामना रंगणार, वंचित आघाडीची भूमिका कशी राहणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे २ दिवस शिल्लक राहील्यानंतर शिवसेना तसेच राष्ट्रवादी या प्रमुख दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले. त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय आखाडा पेटला. मात्र, विद्यमान खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी न दिल्याने शिवसेनेत नाराजी दिसून आली. प्रा.गायकवाड यांचे हजारो समर्थक मंुबईत आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी गेले. मात्र, त्यानंतर हळहळू सेनेतील नाराजी संपुष्ठात येत आहे. इकडे प्रा.गायकवाड समर्थक तथा शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे यांनी उमेदवारी दाखल केल्याने सेनेत बंड होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र सेनेचे उमेदवार ओमराजे यांनी शुक्रवारी उमरग्यात जाऊन प्रा.रवींद्र गायकवाड यांची भेट घेतली. त्यांनी समजूत काढल्यानंतर वरनाळे यंाना घेऊन प्रा.गायकवाड उस्मानाबादेत आले. त्यांच्या उपस्थितीत वरनाळे यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर महायुतीच्या ओमराजेंचा मार्ग सुकर झाल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज शुक्रवारी मागे घेतला. त्यांच्यासमवेत संभाजी िब्रगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड, काकासाहेब राठोड, नवनाथ उपळेकर आणि वरनाळे, अशा ५ उमेदवारांनी माघार घेतली असून, सुशिलकुमार जोशी यांनी गुरूवारी अर्ज मागे घेतल्याने आता १४ उमेदवार रिंगणात उरले आहेत.
हे उमेदवार आता लोकसभेच्या रिंगणात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ५ जणांनी माघार घेतल्याने रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राणा जगजितसिंह पाटील, शिवसेनेकडून ओमप्रकाश पवन राजेनिंबाळकर,वंचित आघाडीकडून अर्जुन सिद्राम सलगर, बहुजन समाज पार्टीकडून डॉ. शिवाजी पंढरीनाथ ओमान, भापसेकडून दीपक महादेव ताटे, भारतीय बहुजन क्रांतीकडून अण्णासाहेब रामचंद्र राठोड, क्रांतीकारी जयहिंद सेनेकडून विश्वनाथ सदाशिव फुलसुरे, अपक्ष तुकाराम दासराव गंगावणे, जगन्नाथ निवृत्ती मुंडे, सय्यद सुलतान लडखान, डॉ. वसंत रघुनाथ मुंडे, नेताजी नागनाथ गोरे, शंकर पांडुरंग गायकवाड, आर्यनराजे किसनराव शिंदे हे उमेदवार आहेत.
पक्षावर नाराज नाही : प्रा. गायकवाड शिवसेनेने आपल्याला दोनवेळा आमदार, एकवेळा खासदार केले. त्यामुळे पक्षावर नाराज होण्याचा प्रश्नच नाही. पक्षाच्या उमेदवाराचे काम करणार असून, कुणीही बंड करणार नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांनी दिले. पक्षाने उमेदवारी न दिल्याने प्रा.गायकवाड कोणती भूमिका घेतात, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते. अनेक दिवसांपासून माध्यमांच्या संपर्कात नसलेले खासदार गायकवाड शुक्रवारी उस्मानाबादेत आले होते. त्यांचे समर्थक बसवराज वरनाळे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, काम करणार,पक्षाने आदेश दिला आहे, कामाला लागा, त्यामुळे कामाला लागणार आहे, असे सांगून ते म्हणाले, काही शिवसैनिक नाराज झाले असले तरी त्यांची नाराजी हळहळू दूर करू. सैनिक कधीही नाराज होत नसतो, पक्ष काम करणाऱ्यांचे समाधान करतो, असे संागत त्यांनी नाराजी नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्यासमवेत ज्ञानेश्वर पाटील, सहसंपर्कप्रमुख अनिल खेाचरे आदी उपस्थित होते.