निवडणूक प्रशिक्षणाला ७४ कर्मचा-यांची दांडी 
तुळजापूर-प्रतिनिधी 
लोकसभा निवडणुकीच्या तुळजापूर तालुक्यातील मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्या पहिल्याच प्रशिक्षणाला तब्बल ७४ कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. गैरहजर कर्मचा-यांना निवडणूक विभागाने नोटीसा बजावल्याने गैरहजर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात निवडणूक कर्मचा-यांसाठी सोमवारी ( दि. २५) निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते १ आणि दुपारी २ ते ६ अशा दोन सत्रात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. जिल्हा पुरवठा अधिकारी चारूशीला देशमुख, सहाय्यक पुरवठा अधिकारी किशोर देशमुख, विस्तार अधिकारी भास्कर बेशकराव, सहशिक्षक शिवाजी वेदपाठक, मास्टर ट्रेनर प्रा. विश्वास पतंगे आदींनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी तहसीलदार योगिता कोल्हे, नायब तहसीलदार अमित भारती, राजाभाऊ केरूलकर, नितीन चौधरी, दत्ता नन्नवरे आदींची उपस्थिती होती. यावेळी १९०८ कर्मचाऱ्यांना पाचारण केले होते. यापैकी ७४ गैरहजर होते. प्रथम सत्रात २०, द्वितीय सत्र ३८, महिला अधिकारी १३, राखीव दोन, एक दिव्यांग कर्मचारी गैरहजार होता. 
 
 
Top