उस्मानाबाद/ प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या तीन उमेदवारांचे अर्ज आज  छाननीवेळी अवैध ठरले. हे तिन्ही अपक्ष उमेदवार आहेत. आता 20 उमेदवार  रिंगणात आहेत. शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने  त्यानंतरच लढाईतील अंतिम योध्दे स्पष्ट होणार आहेत. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आ. राणाजगजितसिंह पाटील  शिवसेनेकडून माजी आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर निवडणूक लढवित आहेत. यासोबत वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगरही रिंगणात आहेत. यांच्याशिवाय इतर आणखी  17 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौ. दीपा मुधोळ - मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सकाळी अर्ज छानणीची प्रक्रिया झाली. या वेळी सर्व प्रमुख उमेदवार उपस्थित होते. या वेळी मनोहर पाटील, विष्णू देडे, लिंबाजी राठोड या तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे अशी : ओमप्रकाश राजेनिंबाळकर (शिवसेना), राणाजगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस), डॉ. शिवाजी ओमान (बसप), अण्णासाहेब राठोड (भारतीय बहुजन
क्रांती दल), दीपक ताटे (भापसे), विश्‍वनाथ फुलसुरे (क्रांतीकारी जयहिंद सेना), अर्जुन सलगर (वंचित आघाडी). अर्चना राणाजगजितसिंह पाटील, अतुल गायकवाड, आर्यराजे शिंदे, काकासाहेब राठोड, नेताजी गोरे, जगन्‍नाथ मुंडे,
तुकाराम गंगावणे, नवनाथ उपळेकर, बसवराज वरनाळे, डॉ. वसंत मुंडे, शंकर गायकवाड, सय्यद लाडखाँ, सुशीलकुमार जोशी (सर्व अपक्ष).
शुक्रवारी दुपारी स्पष्टता
रिंगणात नेमके कोण उमेदवार असतील हे शुक्रवारी दुपारी तीननंतर स्पष्ट
होणार आहे. या दिवशी दुपारी तीनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. तरीही
वैध उमेदवारांच्या यादीवर नजर टाकता उस्मानाबाद लढत दुरंगी होणार हे
स्पष्ट आहे. वंचित आघाडीचे सलगर किती मते खेचतात याकडेही राजकीय
वर्तुळाचे लक्ष आहे.
 
Top