प्रतिनिधी | उस्मानाबाद
यंदा प्रथमच प्रशिक्षण दिलेल्या अधिकारी-कर्मच-याची परीक्षा घेण्यात आली असून प्रत्येक बाबीचे सुटसुटीत नियोजन करण्यात आले आहे. यामुळे उमेदवारांसह निवडणूक अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.
यापूर्वी कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराला त्यांचे तीन ते चार कार्यकर्ते केवळ निवडणूक विभागाच्या परवानग्या घेणे, माहिती घेणे, माहिती सादर करणे आदी कामांसाठी जुंपावे लागत होते. त्यातही वेळेत परवानग्या मिळतील, कागदपत्रे सादर होतील याची शाश्वती नव्हती. परंतु, आगामी लोकसभा निवडणूक २०१९ साठी निवडणूक विभागाने सुटसुटीत नियोजन करून जबाबदाऱ्या निश्चित केल्याने कामकाजातील सावळा गोंधळ बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. पूर्वी मिरवणुका, सभा, कॉर्नर सभा आदींच्या परवानग्या घेण्यासाठी विविध टेबलवर फिरावे लागत होते. परंतु, यंदा सुविधा कक्षात गेल्यानंतर केवळ ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या क्षेत्राच्या पोलिस ठाण्याचे व स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाहरकत प्रमाणपत्र जोडून अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर झाल्यानंतर सुविधा कक्षामार्फत तातडीने तो पोलिस, संबधित विभागाचे आचारसंहिता प्रमुख, तेथील क्षेत्रीय अधिकारी अशा पाच जणांना पोहचत असल्याने ती यंत्रणा तातडीने कामाला लागत आहे. यामध्ये उमेदवारांकडूनच त्यांचे परवानगीचे अर्ज पाच प्रतीत घेण्यात येत असून तेच विविध विभागांकडे सादर केले जात आहेत. यामुळे उमेदवारांचाही वेळ वाचून दुसरीकडे यंत्रणेचीही एेनवेळी होणारी धावपळ टळण्यास मदत होत आहे. उमेदवाराला द्यावा लागणार दररोजचा अंदाजित खर्च: यावेळी आणखी एक बदल उमेदवारांच्या बाबतीत करण्यात आला आहे. तो म्हणजे, यापूर्वी निवडणुकीदरम्यान होणारा खर्च दररोज आयोगाकडे सादर करावा लागत होता. परंतु, यंदा एखादी सभा, मेळावा, रॅली आयोजित करण्यासाठी परवानगी मागतानाच यावर होणारा संभाव्य खर्च उमेदवाराला द्यावा लागणार आहे. त्यानंतर शेवटी अंतिम खर्च सादर करताना आवश्यक पावत्या, बिले जोडावी लागणार आहेत.

पहिल्या टप्प्याचे निवडणूक प्रशिक्षण संपले मागील काही दिवसांपासून तालुकापातळीवर सुरू असलेले पहिल्या टप्प्याचे निवडणूक प्रशिक्षण सोमवारी संपले आहे. यामध्ये मतदान यंत्र हाताळणी, राबवायचे विविध उपक्रम, कामकाजाची पद्धत अशा अनेक बाबींचे हजारो अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

२५ मार्काची परीक्षा 
यंदा प्रथमच निवडणूक विभागाने वतीने प्रशिक्षण पूर्ण झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची परीक्षा घेण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मंुडे यांच्या संकल्पनेतून निवडणूक ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांची घेण्यात आली. या परीक्षेत ज्यांचे प्रशिक्षण झाले आहे त्यांना २५ प्रश्नावलीचे उत्तर विचारण्यात आले. त्यामुळे आपले प्रशिक्षण योग्य पद्धतीने सुरू असल्याची पडताळणीही झाली. मात्र प्रशिक्षणासाठी हजेरी लाऊन ऐन निवडणुकीत इतर सहकाऱ्यांनाच कामाकाजबाबत विचारणा करणाऱ्यांचीही यामुळे अडचण होणार आहे.
 
Top