लोकसभा निवडणुकीचे रणांगण दिवसेंदिवस तापत चालले आहे. मंगळवारी (दि.२६) काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी धडाकेबाज शक्तिप्रदर्शन करत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते एकत्रित आल्याचे दिसले. तर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती. भर उन्हात ढोल-ताशाच्या गजरात काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये तरुणांची मोठी गर्दी होती. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विविध पक्षासह अपक्षांनी २३ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने एकूण ३७ अर्ज दाखल झाले आहेत. 
आघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मंगळवारी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. उस्मानाबाद शहरातील लेडिज क्लब येथून महाआघाडीच्या सर्व दिग्गज लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातून मोठ्या संख्येने शक्तिप्रदर्शन करत दुपारी अडीच वाजेच्या सुमारास उमेदवारी अर्ज दाखल केला. लेडिज क्लब ते उस्मानाबाद शहर पोलिस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रॅली दाखल झाली. त्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रससह महाआघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता. यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल, काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप देशमुख, आमदार बसवराज पाटील, आमदार मधुकरराव चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे, जिप उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, यशस्विनी अभियानच्या राज्य समन्वयक वैशाली मोटे, सक्षणा सलगर, जि.प.चे विरोधी पक्षनेते शरण पाटील, जि.प.चे माजी अध्यक्ष धिरज पाटील यांच्यासह अन्य महाआघाडीतील दिग्गजांच्या उपस्थितीत आमदार पाटील यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुंढे यांच्याकडे दाखल केला. दरम्यान, वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांनीही शक्तिप्रदर्शन करीत मंगळवारी अर्ज दाखल केला. 




लेडीज क्लबपासून रॅलीची झाली सुरुवात जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. 

वरनाळेंचीही उमेदवारी दाखल खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना तिकीट नाकारल्यामुळे शिवसेनेत फूट पडली असून, माजी उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे यांनी बंड करीत मंगळवारी (दि.२६) २५ प्रमुख शिवसैनिकांसह उमेदवारी दाखल केली. आता पुढे काही नाट्य होणार की, उमेदवारी कायम राहणार, याकडे लक्ष लागले आहे. प्रा. गायकवाड सोमवारी रात्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते. त्यात त्यांना ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे सांिगतले जात आहे. 

२३ उमेदवारांचे ३७ नामनिर्देशन अर्ज लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२६) नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस अखेरपर्यंत एकूण २३ जणांनी ३७ नामनिर्देशन फॉर्म दाखल केले आहेत. यामध्ये महाआघाडीकडून राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील, महायुतीकडून शिवसेनेचे माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, वंचित बहुजन आघाडीकडून अर्जुन सिद्राम सलगर, बहुजन समाज पार्टीकडून डॉ . शिवाजी पंढरीनाथ ओमान, भापसे पार्टीकडून दीपक महादेव ताटे, भारतीय बहुजन क्रांती दलाकडून अण्णासाहेब रामचंद्र राठोड, क्रांतिकारी जयहिंद सेनेकडून विश्वनाथ सदाशिव फुलसुरे, अपक्ष नवनाथ दशरथ उपळेकर, अपक्ष सुशिलकुमार दत्तात्रय जोशी, अपक्ष विष्णू गोविंद देडे, अपक्ष तुकाराम दासराव गंगावणे, अपक्ष जगन्नाथ निवृत्ती मुंडे, अपक्ष सय्यद सुलतान लडखान, अपक्ष अतुल विक्रम गायकवाड, अपक्ष डॉ. वसंत रघुनाथ मुंडे, अपक्ष काकासाहेब बापूराव राठोड, अपक्ष नेताजी नागनाथ गोरे, अपक्ष बसवराज गुरुलिंगप्पा वरनाळे, शंकर पांडुरंग गायकवाड, अपक्ष लिंबाजी गोपा राठोड, आर्यनराजे किसनराव शिंदे, मनोहर आनंदराव पाटील यांचा समावेश आहे.
 
Top