प्रतिनिधी/  उस्मानाबाद
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परिसरात सुमारे ७०० झाडांची लागवड करण्यात आली असून, या झाडांची वाढ सुरू असतानाच पाण्याची समस्या निर्माण झाली होती. प्रशासनाने कूपनलिका घेऊन ही समस्या सोडविली असून, आता परिसरात हिरवळ दाटणार आहे. कूपनलिकेमुळे हा परिसर टँकरमुक्त झाला आहे.
औद्योगिक वसाहत परिसरात ६० एकराचा हा उपपरिसर आहे. सध्या मुख्य प्रशासकीय भवन, विज्ञान भवन व विद्यार्थिनी वसतिगृह या तीन इमारती आहेत. तसेच जवळपास ७०० झाडे परिसरात लावण्यात आली आहेत . तसेच या परिसरात शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मिळून जवळपास ७०० लोक दिवसभर असतात. तर या वर्षी मुलांचे वसतिगृह बांधकाम होणार आहे. या सर्व कामांसाठी या पाण्याचा वापर होणार आहे. परिसरात पाच कूपनलिका उपलब्ध असून केवळ दोनच बोअरला पाणी उपलब्ध आहे. तर एकूण अडीच हजार फुटाची जलवाहिनी (पाइप लाइन) उपलब्ध आहे. पाण्यासाठी एकूण कनिष्ठ अभियंता प्रवीण आळंगे, स्थावर विभागाचे धनराज सोमवंशी, तांत्रिक सहायक हेमंत कांबळे यांच्यासह कर्मचारी यांनी प्रयत्न केले. व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून उपपरिसरच्या विकासासाठी जोरदार प्रयत्न केले. संचालक डॉ अनार साळुंके, उपकुलसचिव आय आर मंझा, संजय शिंदे, विद्याधर गुरव यांच्यासह कर्मचारी यांनी पाणी उपलब्ध झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 
 
Top