प्रतिनिधी/ उमरगा
|
राष्ट्रीय महामार्गावरील दाबका गावात एका ट्रकची इलेक्ट्रॉनिक बॅटरी काढताना नागरिकांनी दोन चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन बॅटरीसह दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.२९) मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दाबका गावात शुक्रवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास अभिमन्यू पाटोळे (२५, रा.मानेवाडी ता. तुळजापूर), इनूस अयुब शेख (२९, रा. कुरेशी गल्ली नळदुर्ग) व सागर विभुते (रा. मुळजरोड उमरगा) हे तिघे दाबका येथील ट्रकची (एम. एच. २५- ७८७६) बॅटरी काढून चोरण्याचा प्रयत्न करीत होते. गावातील युवकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यात अभिमन्यू पाटोळे व इनूस शेख हे जागेवर सापडले तर सागर विभुते पळून गेल्याने तो अद्याप फरार आहे. शौकत करीमखॉ पटेल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला अाहे. चोरट्यांकडून ट्रकच्या इलेक्ट्रॉनिक ३ बॅटऱ्यासह २ दुचाकी हस्तगत केल्या. बीट अंमलदार वाल्मिक कोळी तपास करीत आहेत. शुक्रवारी अभिमन्यू पाटोळे व इनुस शेख यांना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. |