उमरगा-प्रतिनिधी
'परत या परत या, बाळासाहेब परत या, रवी सरांना न्याय द्या', अशी भावनिक साद घालत शिवसैनिकांनी आर्त हाक देताच मंगल कार्यालयात निरव शांतता पसरली. निमित्त होते खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांच्या गटातील शिवसैनिकांच्या बैठकीचे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात शनिवारी त्यांच्या समर्थकांनी बैठक घेतली. यावेळी २० वर्षापासूनचा प्रा.गायकवाड यांचा कट्टर समर्थक बाबा भोसले यांनी मंचावरच अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तर १० शिवसैनिकांनी प्रा.गायकवाड यांना उमेदवारी मिळेपर्यंत अर्धनग्न राहण्याचा निश्चिय केला. त्यानंतर शिवसैनिक मुंबईला रवाना झाले असून, ते रविवारी (दि.२४) 'मातोश्री'ला साकडे घालणार आहेत. 
उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांना शेवटाच्या क्षणी उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शांताई मंगल कार्यालयात घेतलेल्या मेळाव्यात हजारो शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करून पक्षप्रमुखांनी विद्यमान खासदार प्रा.रवींद्र गायकवाड यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जितेंद्र शिंदे, जयवंत बुरगुटे (बार्शी), दिलीप जावळे, अॅड. रामेश्वर शेटे, लातूर जिल्हा महिला आघाडीच्या शोभाताई बोंजर्गे, उस्मानाबाद जिल्हा महिला आघाडीच्या शामलताई वडणे, माजी नगरसेविका जयश्री उटगे, तुळजापूरचे उपतालुकाप्रमुख शंकर लोभे, अभिमान खराडे, डॉ. रणजित काकडे (बार्शी), प्रदीप चौधरी, सुधाकर पाटील, बसवराज वरनाळे, एम. ए. सुलतान, रजाक अत्तार, बाळासाहेब देशमुख, प्रकाश तावडे यांच्यासह लोकसभा मतदारसंघातील उस्मानाबाद, बार्शी, औसा, निलंगा, तुळजापूर, उमरगा, लोहारा येथील शिवसेना जिप व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच आणि रवी गायकवाड यांचे अनेक समर्थक उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिवसैनिक निर्माण करण्यासाठी आणि शिवसेना पक्षाला बळकटी देण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली आणि कित्येक फाटक्या शिवसैनिकांना स्वतःची ओळख निर्माण करून देवून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला अशा एकनिष्ठ कार्यकर्त्यास आणि ३ जिल्ह्यातील नेतृत्वास उमेदवारी नाकारली जाते, अशी खंत जितेंद्र शिंदे यांनी व्यक्त केली. तुळजापूरचे शंकर लोभे यांनी ओमराजेंच्या उमेदवारीला प्रा.सावंत कारणीभूत असून शिवसेना संपविण्यासाठी निघालेल्या या लोकांच्या पाठीमागे कुणी राहणार नाही,असे ठणकावले. 
 
Top