मुरुम (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले भारतीय संविधान हे केवळ शासन चालविण्याचे साधन नसून प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाची हमी देणारा लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ आहे. संविधानातील मूल्ये केवळ वाचनापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणली पाहिजेत. प्रत्येक नागरिकाने सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय एकात्मता आणि जबाबदारीची जाणीव ठेवून राष्ट्राच्या उभारणीत आपले योगदान द्यावे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी केले. ते येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात राज्यशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त आयोजित संविधान वाचन सभेत बोलत होते.
यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. बी. ढोबळे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून उपस्थितांनी संविधानाच्या मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ. संजय अस्वले म्हणाले की, संविधानाने प्रत्येक नागरिकाला अधिकार प्रदान करण्याबरोबरच काही मूलभूत कर्तव्यांचीही जाणीव करून दिली आहे. लोकशाही व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करावा, सामाजिक समता आणि सहिष्णुतेची भावना जोपासावी तसेच जात, धर्म, भाषा आणि प्रांत यांपलीकडे जाऊन राष्ट्रीय एकात्मतेला प्राधान्य द्यावे. देशाचे सुजाण, जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनणे हीच संविधानाप्रती खरी निष्ठा असून राष्ट्राच्या विकासासाठी प्रत्येकाने आपल्या कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान दिले पाहिजे.
या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. विनोद देवरकर, उपप्राचार्य डॉ. पद्माकर पिटले, प्रा. जी. एस. मोरे, पर्यवेक्षक प्रा. शैलेश महामुनी, प्रभारी प्राध्यापक डॉ. सुभाष इंगळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. डी. बी. ढोबळे, कार्यक्रमाधिकारी डॉ. भरत शेळके, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. एम. एस. निर्मळे, एनसीसीचे कॅप्टन डॉ. डी. एस. चिट्टमपल्ले, प्रा. एस. जी. जाधव, डॉ. परमेश्वर चव्हाण, प्रा.महेश जोशी, प्रा. बालाजी सुरवसे, प्रा.वर्षा हुलगुंडे आणि महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार कॅप्टन डॉ. डी. एस. चिट्टमपल्ले यांनी मानले.
