तुळजापूर (प्रतिनिधी)- चीनमधील जिनशान येथे झालेल्या पाचव्या वर्ल्ड ज्युनियर सॉफ्ट टेनिस चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आणि मराठवाड्याचा नावलौकिक उंचावणाऱ्या तुळजापूरच्या कन्या प्रियांका किरण हंगरगेकर हिने कांस्यपदकाची कमाई केली. तिच्या या देदीप्यमान यशाची दखल घेत मराठा आरक्षण आंदोलनाचे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे प्रियांका आणि तिच्या माता-पित्यांचा सन्मान करून तिच्या यशाचे कौतुक करण्यात आले.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी प्रियांकाचे विशेष कौतुक करताना, “मराठ्यांचे नाव सातासमुद्रापार पोहोचविल्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद! तुझ्या या यशामुळे संपूर्ण समाजाची मान अभिमानाने उंचावली आहे. अशीच मेहनत घे, जिद्द आणि चिकाटी कायम ठेव. आगामी स्पर्धांमध्येही देशाचे नाव उज्ज्वल कर,“ अशा गौरवोद्गारांतून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत चीनच्या भूमीवर तिरंगा उंचावणाऱ्या प्रियांकाच्या यशाचा गौरव होत असताना उपस्थित समाजबांधवांनीही टाळ्यांच्या गजरात तिचे अभिनंदन केले. एका सामान्य कुटुंबातील मुलीने मेहनत, जिद्द आणि क्रीडाकौशल्याच्या जोरावर जागतिक व्यासपीठावर आपली छाप उमटविल्याने तुळजापूर जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मराठा समाजाचा जनसागर!

दरम्यान, संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या तुळजापूर तालुका दौऱ्यादरम्यान तुळजापूरपासून तीर्थ, गंधोरा, नळदुर्ग ते जळकोटपर्यंत ठिकठिकाणी त्यांचे जंगी आणि जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी, भव्य स्वागत कमानी आणि घोषणांच्या गजरात जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा मराठा समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. तुळजापूर, तीर्थ गंधोरा, नळदुर्ग आणि जळकोट परिसरात स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर समाजबांधव एकत्र आले होते. एकीकडे मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावरील समाजाचा विश्वास आणि दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठ्यांचे नाव उंचावणाऱ्या प्रियांका हंगरगेकर सारख्या गुणवंत कन्येचा गौरव, असा दुहेरी अभिमानाचा क्षण तुळजापूरकरांसाठी ठरला. आंदोलनाच्या लढ्याला जनसमर्थन आणि क्रीडाक्षेत्रातील यशाला सन्मान, अशा उत्साही वातावरणात जरांगे पाटील यांचा तुळजापूर तालुका दौरा चर्चेचा विषय ठरला तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 
Top