तुळजापूर (प्रतिनिधी)- दीपावली सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून हजारो भाविक खासगी वाहनांनी मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील टोलनाक्यावरून तुळजापूरकडे येत आहेत. मात्र, देवीच्या दर्शनासाठी येण्यापूर्वीच तामलवाडी टोलनाक्यावर परिवहन विभागाच्या तपासणीला सामोरे जावे लागत असून, वाहनांची कागदपत्रे पूर्ण असतानाही वेगवेगळ्या त्रुटी काढून पिळवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोप वाहनचालकांकडून होत आहे. त्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकारामुळे वाहनचालकांना आर्थिक भुर्दंडाबरोबरच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. तामलवाडी टोलनाका हा परिवहन विभागाच्या कथित वसुलीचा केंद्रबिंदू बनला आहे का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. वाहनांची तपासणी करणे हे परिवहन विभागाचे कर्तव्य असले तरी तपासणीच्या नावाखाली पैशांची मागणी होत असल्याचे आरोप गंभीर आहेत. त्यामुळे तामलवाडी टोलनाका परिवहन विभागासाठी ‘सोन्याची अंडी देणारी कोंबडी' ठरत आहे का, अशी चर्चा वाहनचालकांत सुरू आहे.
आधीच दुष्काळ आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनाही या कथित प्रकारातून दिलासा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. शेतीमालाची वाहतूक, शेतीकामे आणि दैनंदिन गरजांसाठी वाहनांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना तपासणीच्या नावाखाली अडविले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढत आहेत.