धाराशिव (प्रतिनिधी)- कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पावर आज अचानक कैलास पाटील आणि त्यांच्या प्रवक्त्यांना आलेले हे शहाणपण पाहून एकच प्रश्न पडतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे शहाणपण नेमके कुठे गेले होते?
त्यावेळी प्रकल्पाची कामे रखडलेली असताना, निधीची गरज असताना आणि कामाला गती देण्याची आवश्यकता असताना कैलास पाटील यांनी किती वेळा आवाज उठवला होता? आज योजना पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अचानक पाहणीचा फार्स करून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.
1 टीएमसी पाण्याबाबत आम्ही पहिल्या दिवसापासून अत्यंत स्पष्ट आहोत,हे पाणी सिंचनासाठी नव्हे, तर भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्यासाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना टँकरद्वारे आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करता यावा यासाठी खास बाब म्हणून मागण्यात आले आहे.
आमदार रणाजगजितसिंह पाटील यांनी ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यास तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली. ही बाब वारंवार स्पष्ट करूनही कैलास पाटील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक वेगळा रंग देत आहेत.
आणखी एक महत्त्वाचा प्रश्न कैलास पाटील आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी उत्तर द्यावा
या 1 टीएमसी पाण्याला मोहोळ परिसरातून विरोध झाला, तेव्हा तुमचे नेते कुठे होते? धाराशिवच्या दुष्काळग्रस्त जनतेच्या हक्काच्या पाण्याला विरोध होत असताना एक तरी ठोस आवाज उठवला का? एक निवेदन दिले का? शासनाकडे पाठपुरावा केला का? नाही उलट तेव्हा मात्र तुमचे नेते गप्प बसून तमाशा पाहत होते. आणि आता 1 टीएमसी पाणी मंजूर झाल्यानंतर अचानक दुष्काळग्रस्तांच्या पाण्यावर राजकारण करण्याची आठवण झाली.
धाराशिव शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा उद्देश वेगळा आणि भीषण दुष्काळाच्या परिस्थितीत ग्रामीण भागासाठी विशेषतः अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करण्याचा उद्देश वेगळा ही साधी गोष्टही कैलास पाटील आणि त्यांच्या प्रवक्त्यांना समजत नाही का?
कृष्णा-मराठवाडा योजना क्रमांक 2 चे काम 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध झालेल्या सुविधेचा उपयोग करून सिंदफळ, पांगरधरवाडी आणि रामदरा तलावांमध्ये पाणी साठवून दुष्काळग्रस्त ग्रामीण भागाला दिलासा देण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
धाराशिव शहरासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे म्हणून दुष्काळग्रस्त ग्रामीण भागासाठी अतिरिक्त पाणी आणता येणार नाही, असा हास्यास्पद तर्क नेमका कोणत्या बुद्धिमत्तेतून मांडला जात आहे?
धाराशिव शहराच्या पाण्याची गरज वेगळी आणि संपूर्ण ग्रामीण भागावर आलेल्या दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी 1 टीएमसी अतिरिक्त पाण्याची व्यवस्था वेगळी,इतके साधे गणित समजून घेण्यासाठी तरी कैलास पाटील यांनी थोडा अभ्यास करावा.
आणि 'बंगल्याचा' उल्लेख करणाऱ्या प्रवक्त्यांनी कैलास पाटील यांचा इतिहासही जरा तपासून घ्यावा. कैलास पाटील लहानाचे मोठे नेमके कोणत्या बंगल्याच्या छत्रछायेत झाले आहेत आणि कृष्णा-मराठवाडा योजनेची मुहूर्तमेढ कोणी रोवली, याची माहिती आधी आपल्या नेत्यांकडून घ्यावी.
ज्यांनी या योजनेची पायाभरणी केली, त्या नेतृत्वाचा उल्लेख करणे योग्य की अयोग्य, हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा कैलास पाटील यांना विचारावा.तसेच प्रवक्त्यांनी कैलास पाटलांच्या राजकीय आणि वैयक्तिक इतिहासाकडे एकदा प्रामाणिकपणे पाहावे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना गप्प बसायचे, प्रकल्पाची कामे पूर्णत्वाकडे गेल्यावर अचानक पाहणीचा देखावा करायचा आणि दुष्काळग्रस्तांसाठी मंजूर झालेल्या 1 टीएमसी पाण्यावर संभ्रम निर्माण करायचा,हा जनतेच्या हिताचा संघर्ष नसून निव्वळ राजकीय ड्रामा आहे.
