धाराशिव (प्रतिनिधी)- विवाह सोहळा म्हटले की डामडौल,अनावश्यक खर्च आणि मोठ्या प्रमाणावर होणारी उधळपट्टी असे चित्र अनेकदा पाहायला मिळते.धाराशिव सेवक म्हणुन सामाजिक क्षेत्रात काम करणारे विवेक यादव याला मात्र अपवाद ठरत यादव परिवाराने विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एक अनोखा सामाजिक संकल्प केला आहे.विवाहातील अनावश्यक खर्चाला फाटा देऊन त्यातून वाचणारी रक्कम दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी देण्याचा स्तुत्य निर्णय या परिवाराने घेतला आहे.
ॲड.महादेव व्यंकटराव यादव यांचे सुपुत्र चि.विवेक आणि कै.अनिल संतुकराव चव्हाण यांची कन्या चि.सौ.कां.अंकिता यांचा शुभविवाह होत असून,या शुभ विवाहानिमित्त सोमवार,दि.30 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजता धाराशिव येथील नाईकवाडी नगर,समता कॉलनी परिसरातील पुष्पक मंगल कार्यालय येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.या विवाह सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे यादव परिवाराने घेतलेला सामाजिक संकल्प होय.आपल्या विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदत करण्याचा निर्धार परिवाराने व्यक्त केला आहे. या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या इच्छेनुसार योगदान द्यावे,असे आवाहनही निमंत्रण पत्रिकेतून करण्यात आले आहे.आजच्या काळात विवाह सोहळ्यांवर होणारा अवाढव्य खर्च पाहता,त्यातील काही रक्कम गरजू आणि संकटग्रस्त घटकांच्या मदतीसाठी वापरण्याचा हा विचार निश्चितच अनुकरणीय आहे. विवाह हा केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण नसून, त्या आनंदातून समाजातील गरजू व्यक्तींच्या जीवनातही आशेचा प्रकाश निर्माण करता येतो, हा सकारात्मक संदेश यादव परिवाराने दिला आहे.आनंदाच्या क्षणांना सामाजिक संवेदनशीलतेची जोड देत शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या यादव परिवाराचा हा संकल्प समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.असे मत सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी व्यक्त करीत म्हण्टले की, धाराशिव सेवक फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत प्रसिध्दीच्या झोतात न राहणा-या विवेक यादव यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी वधु मुलीच्या कुटुंबियाकडुन एकही रुपया न घेता हुंडाच्या चालीरितीला देखील फाटा दिला आहे,ही अत्यंत आदर्शवत बाब आहे.