धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील येडशी येथील करंडे गिफ्ट सेंटर व करंडे किराणा दुकानाला मध्यरात्री सुमारे 2 ते 2:30 वाजण्याच्या दरम्यान लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मन सुन्न करणारी आहे. अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी येडशी येथील प्रत्यक्ष भेटीनंतर दिली आहे. 

या भीषण आगीत संपूर्ण दुकान व घर जळून खाक झाले. घरातील सात जणांपैकी केवळ 20 वर्षीय तरुणाचा जीव वाचला. विशेषतः आपल्या मुलाचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांनी स्वतःचे प्राण गमावल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. मुलाच्या रक्षणासाठी एका पित्याने केलेला हा अखेरचा संघर्ष मन हेलावून टाकणारा आहे.

आज या दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधितांकडून घटनेची माहिती घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच पीडित कुटुंबाला शासनाच्या वतीने तातडीने आवश्यक ती आर्थिक मदत व पुनर्वसनासाठी सहकार्य मिळावे. या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी पीडित कुटुंबीयांच्या दुःखात मनापासून सहभागी असून, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

 
Top